राजकीय पोळी कुठे भाजायची याचे तरी भान ठेवाः आ. रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

0
3827

मुंबईः राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चाललेला असतानाच कुरघोडीचे राजकारणही वाढताना दिसू लागले आहे. राज्यावर आलेले कोरोनाच्या संकटाविरुद्ध एकोप्याने लढण्याची गरज असतानाच्या काळातही राजकारण करण्याच्या प्रवृत्तीवर नेमकेपणाने बोट ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राजकीय पोळी कुठे भाजावी, याचे तरी भान ठेवा, असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता हाणला आहे.

आजच्या संकटात राज्याला पैशांची गरज असताना हक्काच्या १६ हजार कोटींसाठी एकजुटीने केंद्राकडे पाठपुरावा करण्याऐवजी पत्र लिहिण्यात एक्सपर्ट असलेले काही नेते राज्य सरकारला खिंडित गाठण्याचा दुर्दैवी प्रयत्न करत आहेत. राजकीय पोळी कुठे भाजावी, याचे तरी भान त्यांनी ठेवायला हवे, असे ट्विट आ. रोहित पवार यांनी केले आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तबलिगींबाबत कोणताही जातीय अभिनिवेश न बाळगता कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊनही तबलिगी संशयितांवर कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन त्यांनी दिले होते. याच मुद्यावर रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता निशाणा साधला आहे.

खरे तर दिल्लीतील घटनेबाबत त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोलायला पाहिजे. पण राज्य सरकारने आधीच योग्य पावले उचलली असतानाही त्याच मागण्यांचे पत्र आणि मुख्यमंत्र्यांना द्यायचे आणि दुसऱ्याच दिवशी राज्यपालांनाही भेटायचे या ‘चमकदार’ व ‘अभ्यासपूर्ण’ कामाला आणखी काय म्हणावे?, असा टोलाही रोहित पवार यांनी ट्विटद्वारे हाणला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा