राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ६३ वर, आज एकाच दिवशी आढळले ११ नवे रूग्ण

0
378
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. मुंबईत १० तर पुणे येथे १ अशा नवीन ११ रूग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ६३ वर पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील एकूण कोरोना बाधितांपैकी १२ ते १३ जणांना संसर्गातून कोरोनाची लागण झाली आहे, तर उर्वरित कोरोनाबाधित परदेशातून आले आहेत, असेही टोपे यांनी सांगितले.

 राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना कोरोना संसर्गाच्या साथीवरील उपाययोजनांची माहिती दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. सध्या राज्यातील कोरोनाची साथ दुसऱ्या टप्प्यात आहे. परंतु अशीच परिस्थिती कायम राहिल्यास चिंता वाढू शकते, अशी भितीही टोपे यांनी बोलून दाखवली. राज्यात कोरोना चाचणीसाठी ११ लॅब कार्यरत आहेत. आज सापडलेल्या ११ कोरोना बाधितांपैकी ८ जण परदेशातून आलेले आहेत, तर तीन जणांना संसर्गातून बाधा झालेली आहे. असे सांगतानाच नागरिकांनी खबरदारी घ्यावी. घर आणि कार्यालयातील एसी बंद ठेवावे, रेल्वे स्टेशन- बस स्टँडवरील गर्दी कमी करावी, असे आवाहनही टोपे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा