कोरोना विषाणु संसर्गाच्या चौथ्या टप्प्यात भयावह स्थिती, भारत सध्या दुसऱ्याच टप्प्यावर !

0
495
प्रतिकात्मक छायाचित्र.

नवी दिल्लीः  भारतात कोरोना विषाणुचा संसर्ग किती धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचला आहे, याची तपासणी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने( आयसीएमआर) सुरू केला असून या तपासणीचा पहिला अहवालही आला आहे. कोरोना विषाणुच्या फैलावाचा स्तर मोजण्यासाठी चार टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. त्यापैकी भारत सध्या कोरोना फैलावाच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. भारत अजून कोरोना फैलावाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेला नाही, असे या अहवालात म्हटले आहे. कोरोना फैलावाच्या चौथ्या टप्प्यात परिस्थिती अत्यंत भीषण बनते आणि महामारी घोषित केली जाते. म्हणजेच या टप्प्यात कोरोनाचा फैलाव नियंत्रित करणे हाताबाहेरचे होऊन बसते.

आयसीएमआरने कोरोना विषाणुच्या फैलावाचे चार टप्पे निश्चित केले  आहेत. त्यात पहिला टप्पाः  दुसऱ्या देशातून संसर्ग झालेली व्यक्ती आली असेल. दुसऱ्या टप्प्यात स्थानिक पातळीवर संसर्ग झाला असेल. तिसरा टप्पाः सामुदायिक संसर्ग म्हणजेच संसर्ग झालेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येता कोरोना विषाणुचा फैलाव झाला असेल आणि चौथा टप्पाः कोरोनाच्या संसर्गाने महामारीचे स्वरूप धारण केले असेल.

भारतात सामुदायिक संसर्ग तर झालेला नाही ना, याचा शोध घेण्यासाठी आयसीएमआरने ही तपासणी हाती घेतली  आहे. कोणत्याही संसर्ग झालेल्या ज्ञान व्यक्तीच्या संपर्कात न येता किंवा संसर्ग झालेल्या देशातून प्रवास करून आलेले नसतानाही संसर्ग झालेला असेल तर त्याला सामुदायिक संसर्ग असे संबोधले जाते.  या टप्प्यावर लॉकडाऊनसारख्या उपाययोजना कराव्या लागतात.

आयसीएमआरने त्यासाठी १ मार्च ते १५ मार्च या काळात १०२० रँडम सॅम्पल घेतले होते. या रँडम सॅम्पल्समध्ये कोरोनाचा संसर्ग झालेला आहे किंवा नाही, हे पाहणे त्या मागचा हेतू होता. ज्या लोकांना श्वसनाचा गंभीर आजार आहे आणि न्यूमोनिया आणि एन्फ्लुएंझासारखी लक्षणे आहेत, अशाच लोकांचे नमुने गोळा करून त्याची तपासणी करण्यात आली आहे. या नमुन्यांपैकी ५०० नमुन्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. ते सर्व निगेटिव्ह आहेत. म्हणजेच त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. याचाच अर्थ भारतात अद्याप सामुदायिक पातळीवर कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. म्हणजेच भारत अजून कोरोना संसर्ग फैलावाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचला नाही, असाही त्याचा अर्थ आहे.

 असे असले तरी भारतातील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. आजवर देशात १४७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४२ रूग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशातील एकूण बाधित रूग्णांपैकी २५ रूग्ण परदेशी आहेत. कोरोनामुळे देशात आजपर्यंत तिघांचा मृत्यू झालेला आहे. बाधितांपैकी १४ रूग्ण पूर्णतः ठणठणीत झाले असून सध्या १३० रूग्णांवर देशातील विविध रूग्णालयांत उपचार सुरू आहेत.

देशभरातून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी एकाही नमुन्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले असते तर भारत कोरोना विषाणु फैलावाच्या सामुदायिक संसर्गाच्या पातळीवर येऊन ठेपला आहे, असा त्याचा अर्थ होतो, असे आयसीएमआरने म्हटले आहे.

सध्या ज्या नमुन्यांचे तपासणी अहवाल आले आहेत, त्यात सामुदायिक संसर्गाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. परंतु आम्ही कोरोना विषाणुचा फैलाव नियंत्रित केला आहे, असे आताच म्हणणे घाईचे ठरेल. आपण आपल्या सीमा किती भक्कमपणे सील करतो, त्यावरच कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत होणार आहे. भारतात सामुदायिक संसर्ग होणारच नाही, असे आमचे म्हणणे नाही, असे आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा