समाजात दुही माजवणाऱ्यांची गय केली जाणार नाहीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा

0
17
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी जेंव्हा हात जोडून म्हणतो ते माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधु, माता- भगिनींसाठी असते जे अतिशय संयमाने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने या कोरोना विषाणुविरुद्ध लढत आहेत. पण समाजात आणखी एक समाजविघातक विषाणू पसरत आहे. सध्याच्या परिस्थितीचा दुरूपयोग करून जर कुणी माझ्या बंधू, माता-भगिनी आणि महाराष्ट्राला अडचणीत आणत असेल तर अशा समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. आज मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमांवरील थेट प्रसारणाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले.

कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांना मान्यता नाहीचः कोणत्याही धर्माच्या, पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांना मान्यता नाहीच. राज्यात पाडवा, रामनवमी, पंढरपुरची यात्रा यासारखे सर्व मोठे सण अगदी घरगुती स्वरूपात आयोजित झाले, कोणतेही मोठे उत्सव वा कार्यक्रम झाले नाहीत. ज्याप्रमाणे हे कार्यक्रम झाले त्याचप्रमाणे इतर धर्मियांनी सुद्धा आपले सण, समारंभ आणि कार्यक्रम करावेत. एकत्र येणे, गर्दी करणे टाळावे कारण राज्यात कोणत्याही धर्माच्या, राजकीय पक्षाच्या आणि कोणत्याही कारणासाठी कोणत्याही कार्यक्रमांना, खेळाच्या स्पर्धांना परवानगी दिली जाणार नाही म्हणजे नाहीच. तशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे असे कार्यक्रम आयोजित केलेच जाऊ नयेत असे कडक शब्दात स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, या विषाणुशी सगळे एकजुटीने लढत आहेत. याला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, ते सहन केले जाणार नाही.

इलाज म्हणून नाईलाजाने घरी बसाः हा विषाणू कोणताही जातधर्म पहात नाही. याची बाधा सगळ्यांना सारखीच होते. त्यामुळे इलाज म्हणून नाईलाजाने का होईना घरी बसा, गर्दी टाळा, संयम, जिद्द आणि आत्मविश्वासारखे दुसरे आयुध नाही, या आयुधाच्या मदतीने आपण हे युद्ध नक्की जिंकू असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी आज समाजविघातक कृत्ये करणाऱ्या प्रवृत्तींना आपल्या बोलण्यातून स्पष्ट इशारा आणि कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

मुंबईकरांची एकजुट आणि जिद्द अतुलनीयः जिल्ह्याजिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढवल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सगळ्या जगाचे जसे मुंबईकडे लक्ष आहे तसेच विषाणुचेही. पण ही मुंबई आहे, या शहराने अनेक धक्के आणि अपघात पचवले आहेत. त्यांचे शौर्य नेहमीच अतुलनीय राहिले आहे. एकजुट आणि जिद्द हा या शहराचा स्थायीभाव आहे. या मुंबईचे हा विषाणु काही बिघडवणार नाही असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईत कोविड-१९ साठी स्वतंत्र रुग्णालये सुरु करण्यात आली आहेत. सर्दी, पडसे, न्युमोनियाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी नेहमीच्या दवाखान्यात न जाता सरकारी रुग्णालयात, कोविड चाचणी केंद्रात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी. त्यामुळे इतर दवाखाने सुरक्षित राहतील, बंद होणार नाहीत, असे ठाकरे म्हणाले.

गर्दी कशाला करता? अंतर ठेवून वागाः जीवनावश्यक वस्तुंची २४  तास उपलब्धता असतांना गर्दी का करता असा सवालही मुख्यमंत्र्यांनी जनतेस विचारला. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, तुम्ही अंतर ठेऊन वागाल तर कोरोनाचा धोका ही तुमच्यापासून दूर राहील. माझा माझ्या राज्यातील जनतेवर विश्वास आहे. माझ्या मनात आत्मविश्वास आहे. याबळावर एकजुटीने आपण कोरोनावर मात करू, संयमाची, जिद्दीची आणि आत्मविश्वासाची ही भिंत मनात अशीच मजबूत ठेवा, कोरोना तुमचं काही ही बिघडवू शकणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले तसेच या लढाईत आपणच जिंकणार हा विश्वासही व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा