३० एप्रिलपर्यंत सर्वांनी सहकार्य केले तरच पुन्हा लॉकडाऊन वाढणार नाहीः अजित पवार

0
229
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि प्रसार रोखण्यासाठी राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात येत आहे. नागरिकांनी या निर्णयाला पाठिंबा, संपूर्ण सहकार्य करावे. ३० एप्रिलपर्यंत घरातच थांबावे. हा लॉकडाऊन यशस्वी झाला तरच पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याची वेळ येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

 राज्याच्या काही भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. तेथील संसर्ग रोखण्यासाठी संबंधित गावे, वाड्या, वस्त्या, सोसायट्या सील केल्या जात आहेत. यामुळे सध्या गैरसोय होत असली तरी लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

आपला व आपल्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी सरकारने लॉकडाऊन वाढवला आहे.लोकहितासाठी घेतलेल्या ३० एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनला राज्यातील जनतेने सहकार्य करावे. प्रत्येकाने घरातच थांबावे. डॉक्टर, पोलिस, शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे. हा लॉकडाऊन यशस्वी झाला तर कदाचित पुन्हा लॉकडाऊन वाढवावा लागणार नाही, याचा विचार करुन राज्यातल्या प्रत्येकानेच कोरोनावर मात करण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.

ईस्टर संडेच्या शुभेच्छा अजित पवार यांनी ‘ईस्टर संडे’निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून भगवान येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा हा दिवस आपल्या जीवनात आनंद घेऊन येईल. मानवतेच्या सेवेसाठी प्रेरित करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. कोरोनाच्या संकटामुळे ‘इस्टर संडे’ची प्रार्थना आपापल्या घरात करावी. कुणीही घराबाहेर पडू नये, घरात राहा, सुरक्षित राहा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

‘इस्टर संडे’ म्हणजेच ‘पुनरुत्थान दिन’. भगवान येशू ख्रिस्त हे ‘इस्टर संडे’ दिवशी मृत्यूवर मात करुन पुनरुत्थित झाले होते. यानिमित्ताने त्यांचं स्मरण करत असताना, आपणही ‘कोरोना’वर मात करण्याचा निर्धार करुया. भगवान येशू ख्रिस्तांच्या दया, प्रेम, क्षमा, शांती आणि मानवतेच्या सेवेची शिकवण अंगिकारण्याचा प्रयत्न करुया. असेही त्यांनी संदेशात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा