कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास कारखाना मालकाविरुद्ध गुन्हा नाहीः राज्य सरकारचा खुलासा

0
99
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबईः कारखाना किंवा आस्थापनातील कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असे महाराष्ट्र शासनाने एका प्रसिद्ध पत्रकान्वये स्पष्ट केले आहे. याबाबत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत असलेल्या पत्रकाचा आणि महाराष्ट्र सरकारचा काहीही संबंध नसल्याचा खुलासाही राज्य सरकारने केला आहे.

कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे सरकारसोबतच्या एका बैठकीत सांगण्यात आल्याची माहिती सोशल माध्यमे किंवा व्हॉटस्ॲपवरुन फॉर्वर्ड केली जात आहे. अशी बैठक महाराष्ट्रात झालेली नाही व त्या निर्णयाचा महाराष्ट्राशी सुतरामही संबंध नाही. किंबहुना मुळात तसा प्रस्तावही शासनाच्या विचाराधीन नाही,  असे स्पष्टीकरण प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आले आहे.

फॉर्वर्ड केले जाणारे पत्रक हे अन्य राज्यातील एका औद्योगिक आस्थापनांच्या बैठकीतील वृत्तांत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. पण ते महाराष्ट्रातील असल्याचे भासवून राज्यात प्रसारित करुन गैरसमज पसरवण्यात येत आहे. कारखाने सुरु केले आणि त्यातील कामगाराला कोरोने विषाणूची लागण झाल्यास मालकाविरुद्ध कारवाई येईल, अशी चुकीची माहिती या पत्रकाच्या आधारे पसरवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही औद्योगिक संघटनेच्या बैठकीत अशा प्रकारची चर्चा झालेली नाही. हे परिपत्रक फॉर्वर्ड करु नये तसेच त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे.

कोरोना विषाणूची कोणालाही लागण झाल्यास शासनाच्या आरोग्य विभागामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल. चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. राज्यातील ज्या भागात कारखाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे, तेथील कारखाना आस्थापनांनी कोरोना रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा