मुंबईची लोकल सुरू करण्याशिवाय पर्याय नाही, पाठपुरावा कराः मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

0
47
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: वैद्यकीय सेवा तथा अन्य अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी लागणार्‍या मनुष्यबळासाठी मुंबई रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे निदेश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रशासनाला दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचारांसाठी डॉक्टरांनी आपले क्लिनिक सुरू करणे आवश्यक असल्याने त्यांना पीपीई किट देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

येत्या पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार वाढण्याची शक्यता असते. या आजारांची आणि कोरोनाची लक्षणे सारखी असल्याने जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. महापालिकांची आणि शासनाची रुग्णालये ही कोरोना रुग्णालये म्हणून राखून ठेवण्यात आलेली असल्याने पावसाळ्यातील आजारासंदर्भात खाजगी रुग्णालयांची भूमिका जास्त महत्त्वाची असणार आहे. या रुग्णालयांच्या कर्मचारी वर्गाकरिता सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असणे गरजेचे आहे. म्हणून केंद्राकडे अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांकरिता आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सेवांसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी आपण केंद्राकडे केली आहे. त्याचा प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या. कोरोना विषाणू प्रादर्भावाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी आज आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत.

खासगी डॉक्टरांना पीपीई किट द्याः कोरोना संदर्भात जनमानसात असलेली भीती दूर होणे आवश्यक आहे. ताप, कोरडा खोकला, अशक्तपणा, अर्धशिशी, नाक चोंदलेले असणे अशा स्वरुपाची लक्षणे दिसत असल्यास लगेच चाचणी करणे गरजेचे आहे. पण अशी चाचणी डॉक्टरांच्या लेखी सल्ल्याशिवाय करता येत नाही आणि अनेक डॉक्टरांना त्यांच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी खबरदारी घेतल्याशिवाय रोग्यांची तपासणी करणे योग्य वाटत नाही. त्यांची यासंदर्भातील काळजी दूर करण्यासाठी त्यांना महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसरमार्फत पीपीई कीट पुरवण्यात यावेत, असे ठाकरे म्हणाले.

राज्यात आणखी २६ प्रयोगशाळाः जगात आणि देशात अन्यत्र कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांचे प्रमाण ५ ते ७ टक्के असताना राज्यातील मृत्यू दर ३.३ टक्के आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत. कोरोनाच्या प्रादुर्भावापूर्वी कोरोना विषाणू चाचणीसाठी राज्यात केवळ २ सध्या शाळा होत्या. केवळ २ महिन्यात आपण राज्यात ७२ प्रयोगशाळा सुरू करू शकलो. येत्या आठवड्यात नव्याने २६ लॅब कार्यान्वित होतील.

 ११ तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृतीदलाचे कौतुकः कोरोनावर उपचारासाठी नेमण्यात आलेल्या ११ तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृतीदलाचे केंद्राने आणि अन्य राज्याने कौतुक केले आहे. या डॉक्टरांनी उपचाराचा प्रोटोकॉल तयार केला आहे. तो सर्व जिल्ह्यांना पाठवण्यात आला. हे डॉक्टर्स २४ तास उपलब्ध असून कुठल्याही जिल्ह्याला उपचाराबाबत आवश्यकता असल्यास ते त्यांना संपर्क करु शकत असल्याने कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूची टक्केवारी रोखण्यात आपल्याला यश आले आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता, महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा