रेल्वे स्टेशनवर येऊ नका, वैयक्तिक तिकिट मिळणार नाहीः रेल्वेचे स्पष्टीकरण

0
172
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, पर्यटक आणि भाविकांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने विशेष रेल्वे सुरू केल्या असल्या तरी या रेल्वेने फक्त नोंदणीकृत आणि निर्देशित व्यक्तींनाच प्रवास करता येणार आहे. कुणालाही वैयक्तिक तिकिटे दिली जाणार नाहीत. त्यामुळे विनाकारण रेल्वे स्टेशनवर येऊ नका, असे आवाहन भारतीय रेल्वेने केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची मुदत १७ मेपर्यंत वाढवतानाच केंद्र सरकारने अडकून पडलेले कामगार, विद्यार्थी, पर्यटक, भाविक यांच्यासाठी शुक्रवारपासून विशेष ‘श्रमिक रेल्वे’ सुरू केल्या आहेत. मात्र अडकून पडलेल्या या लोकांना आधी नोडल अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी लागणार आहे. केवळ नोंदणीकृत आणि नोडल अधिकाऱ्यांनी निर्देशित केलेल्या लोकांनाच या रेल्वेने प्रवासाची परवानगी आहे. असे असले तरी काही लोक रेल्वे स्टेशनवर येत असल्यामुळे भारतीय रेल्वेने हा खुलासा केला आहे.

राज्य सरकाद्वारा नोंदणीकृत व्यक्तींसाठीच विशेष रेल्वेचे नियोजन केले जात आहे. कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही कारणास्तव रेल्वे स्टेशनवर येऊ नये. कोणालाही वैयक्तिक पातळीवर तिकिट दिले जाणार नाही किंवा वैयक्तिक विनंतीही मान्य केली जाणार नाही, असे रेल्वेने म्हटले आहे.

ज्या राज्यांमध्ये विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत, तेथे राज्य सरकारकडून एक-एक बॅचमध्ये लोकांना रेल्वे स्टेशनवर पाठवावे लागणार आहे. या रेल्वेमध्येच लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा नोडल अधिकाऱ्यांनी मोबाइलवर पाठवलेला टेक्स्ट मेसेज तिकिट गृहित धरले जाणार आहे. फॉर्वर्ड केलेला मेसेज तिकिट म्हणून गृहित धरला जाणार नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा