कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ५० वर्षे होणार?, सरकार म्हणते तसा विचार नाही

0
245

नवी दिल्लीः सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय कमी करून ५० वर्षे करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही आणि तसा प्रस्तावही नाही, असा खुलासा कार्मिक मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केला आहे.

सरकारी सूत्रे आणि डीओपीटीचा हवाला देऊन काही माध्यमांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृतीचे वय घटवून ५० वर्षे करण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करत असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर डॉ. जितेंद्र सिंह यांनी हा खुलासा केला आहे. देशावर सध्या कोरोनाचे संकट असून त्याविरुद्ध नियोजनबद्ध पद्धतीने लढा देण्यात येत आहे. कोरोनाचे आव्हान आल्यानंतर डीओपी अँडने कर्मचाऱ्यांचे हितरक्षण करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले आहेत. लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर सरकारी कार्यालयात अत्यंत आवश्यक व कमीत कमी कर्मचाऱ्यांत कामकाज करण्याच्या सूचना जारी केल्या होत्या, असे सिंह म्हणाले.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर डीओपीटीने सरकारी अधिकाऱ्यांना वार्षिक प्रदर्शन मूल्यांकन अहवाल ( एपीएआर) दाखल करण्याची अंतिम तारीखही पुढे ढकलली होती, असेही सिंह म्हणाले. मागील आठवड्यात निवृत्ती वेतनात ३० टक्के कपात आणि ८० वर्षापेक्षा जास्त वयाच्या सेवानिवृत्ताचे निवृत्तीवेतन बंद करण्याचा निर्णय झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याचे खंडन करत डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की,  ३१ मार्चपर्यंत ज्याच्या खात्यात निवृत्तीवेतनाची रक्कम जमा झाली नाही, असा एकही निवृत्तीवेतनधारक नाही. गरजेनुसार टपाल खात्याची सेवा घेऊन निवृत्तीवेतनधारकाच्या घरी निवृत्तीवेतन पोहोचवण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा