पगार कपात नव्हे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दोन टप्प्यांत पूर्ण पगारः अजित पवार

0
133
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोनाच्या संटकामुळे राज्याची अर्थव्यवस्था ठप्प झाली असून खबरदारीच्या उपाययोजना म्हणून राज्य सरकारने काटकसरीचा मार्ग अवलंबला आहे. त्या दृष्टीने काही खर्च लांबणीवर टाकण्यात येत असून याच प्रयत्नांचा भाग म्हणून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दोन टप्प्यांत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या बाबतचा शासनादेश जारी करण्यात आला आहे.  सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांचा संपूर्ण देय पगार दोन टप्प्यांत मिळेल, कोणाचाही पगार कपात केलेला नाही, असे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

या आधी राज्य सरकारने सर्व लोकप्रतिनिधींच्या पगारात ६० टक्के, अ वर्ग आणि ब वर्ग कर्मचाऱ्यांच्या पगारात ५० टक्के आणि क वर्ग कर्मचाऱ्यांच्या पगारात २५ टक्के कपात केल्याचे वृत्त आले होते. मात्र राज्य सरकारने जारी केलेल्या शासनादेशानुसार ही पगार कपात नसून दोन टप्प्यांत करायवाच्या पगाराची टक्केवारी असल्याचे स्पष्ट झाले. या शासनादेशानुसार मार्च महिन्याच्या पगाराचे दोन टप्पे करण्यात आले असून पहिल्या टप्प्यांत सर्व लोकप्रतिनिधींना ४० टक्के, अ वर्ग आणि ब वर्ग कर्मचाऱ्यांना ५० टक्के, क वर्ग कर्मचाऱ्यांना ७५ टक्के तर ड वर्गातील कर्मचाऱ्यांना १०० टक्के पगार केला जाणार आहे. या कर्मचाऱ्यांना उर्वरित पगाराची रक्कम दुसऱ्या टप्प्यात दिली जाणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेहमी एकाच टप्प्यांत करण्यात येतो. मात्र केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मिळणारे १६ हजार ६५४ कोटी रुपये आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशीही मिळाले नसल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचा पगार एकाच टप्प्यात करणे अशक्य आहे. ही थकबाकीची रक्कम मिळाली असती तर एकाच टप्प्यात पगार करणे शक्य झाले असते, असे अजित पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा