औरंगाबादेत ऑड-इव्हन फॉर्म्युलाः विषम तारखांना शहर पूर्णतः बंद, समतारखांना फक्त चार तास मुभा

0
195

औरंगाबादः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनीही शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ऑड-इव्हन फॉर्म्युला लागू केला असून १७ मेपर्यंत विषम तारखांना औरंगाबाद शहर पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. समतारखांना केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी ७ ते ११ पर्यंतची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज शनिवारपासून केली जाणार आहे.

हेेही वाचाः १७ मेपर्यंत वाढवला देशव्यापी लॉकडाऊन; रेल्वे, विमानसेवाही बंदच!

पोलिस आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयानुसार १७ मेपर्यंत ३, ५, ७,९,११,१३, १५ आणि १७ मे या विषमतारखांना औरंगाबाद शहरात पूर्णतः बंद पाळण्यात येणार आहे. म्हणजेच विषमतारखांना जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंदच रहाणार आहेत. समतारखांना म्हणजेच २,४,६,८,१०,१२,१४ आणि १६ मे या तारखांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. समतारखांनाही सकाळी ११ वाजेनंतर शहरात पूर्णतः बंद रहाणार आहे. जमावबंदी आणि संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण घराबाहेर पडून रस्त्यावर आढळून येणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशा व्यक्तींची वाहनेही जप्त करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

हेही वाचाः लॉकडाऊन-३ मध्ये काय सुरू आणि काय बंद?

शहरातील ज्या भागामध्ये रस्त्यावर लोकांची गर्दी आढळून येत असेल अशा भागांची टेहळणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी आणि रस्त्यावर लोक फिरताना दिसत असतील अशा व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवून घरीच सुरक्षित रहावे, असे आवाहन सहायक पोलिस आयुक्त ( गुन्हे) डॉ. नागनाथ कोडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा