उद्यापासून औरंगाबाद शहरात ऑनलाइन तर जिल्ह्यात थेट मद्यविक्रीला परवानगी

0
852
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबादः महाराष्ट्राचे ‘लिकर हब’ अशी ओळख असलेल्या औरंगाबादेतील मद्यविक्रीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी उद्या, सोमवारपासून औरंगाबाद शहरात ऑनलाइन तर ग्रामीण भागात थेट मद्यविक्रीला परवानगी दिली आहे.

शहरातील कंटनेमेंट झोन वगळता अन्य भागांतील मद्यविक्रीच्या दुकानांतून १ जूनपासून ऑनलाइन मद्यविक्रीची परवानगी देण्यात आली आहे. परवानाधारकांनाच ऑनलाइन मद्य खरेदी करता येणार आहे. ज्या ग्राहकांकडे परवाना नाही, अशा व्यक्तींना मद्यविक्रेत्यांकडून परवाना घेता येऊ शकतो. शहरातील ग्राहकांना संबंधित मद्यविक्रेत्याच्या व्हॉट्सअप क्रमांक, मोबाइल क्रमांकावर मेसेज पाठवून किंवा थेट दूरध्वनी करून मद्याची मागणी नोंदवता येईल. एकदा मद्याची मागणी नोंदवली की मद्यविक्रेत्यांचे डिलिव्हरी बॉय संबंधित ग्राहकांपर्यंत मद्य पोहोचवतील. या डिलिव्हरी बॉयची वैद्यकीय चाचणी करून घेण्याची जबाबदारी मद्यविक्रेत्यांची असेल. मद्याची डिलिव्हरी करताना या डिलिव्हरी बॉयने मास्क, हेडकॅप, हँडग्लोव्हज वापरणे अनिवार्य असेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र थेट दुकानातूनच मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. ग्रामीण भागात सकाळी १० ते सायंकाळी १० वाजेपर्यंत मद्याची दुकाने उघडी राहतील. मद्यविक्रीच्या दुकानांवर दोन ग्राहकांमध्ये किमान सहा फूटांचे अंतर राखणे आवश्यक आहे. दुकानावर गर्दी होणार नाही, याची काळजी ग्रामीण भागातील मद्यविक्रेत्यांनी घ्यायची आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा