महिना उलटला तरी फक्त १० टक्के लोकांनाच मिळाली मोदींच्या ‘गरिब कल्याण पॅकेज’ची डाळ

1
188
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने एक महिन्यापूर्वी मदतीच्या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र हे पॅकेज सर्वसामान्य जनतेपर्यंत अद्यापही पोहोचलेले नाही. या पॅकेज अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाच्या कक्षेत येणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला एक किलो डाळ देण्यात येणार होती. परंतु घोषणेला एक महिना उलटून गेला तरी आतापर्यंत केवळ १० टक्केच गरिबांना मोदी सरकारची ही डाळ मिळाली आहे. उर्वरित ९० टक्के गरीब अद्यापही या डाळीपासून वंचित आहेत.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत दर महिन्याला १.९५ लाख मेट्रिक टन डाळीचे  वाटप करण्यात येणार होते. परंतु आतापर्यंत एकूण १९,४९६ टन डाळच वाटण्यात आली आहे. वाटप करण्यात आलेल्या डाळीचे हे प्रमाण केवळ १० टक्के आहे, असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. डाळीच्या साठ्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ म्हणजेच नाफेडवर सोपवण्यात आली होती. अन्न मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार १९.५५ कोटी कुटुंबांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत मोफत डाळ वाटण्यात येणार होती.

पॅकेजच्या घोषणेनुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी एकूण १ लाख ९५ हजार ५३१ मेट्रिक टन डाळ देणे आवश्यक होते. परंतु आतापर्यंत राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांत केवळ ४४ हजार ९३२ टन डाळच पोहोचली आहे. त्यापैकी १९ हजार ४९६ टन डाळच लोकांना मिळाही आहे. केंद्र सरकारने २६ मार्च रोजी प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेजची घोषणा केली होती. देशातील कोणीही गरीब उपाशी राहणार नाही, असा दावाही ही घोषणा करताना करण्यात आला होता मात्र, ही घोषणा झाल्यानंतर दाल मिल्सनी लगेच काम सुरू केले नाही. घोषणेनंतर खूप विलंबाने काम सुरू झाले, असे याचे एक कारण सांगितले जात आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा