रामदासे रचिला पाया, ‘तू’ का झालासी कळस?

0
419

कोरोनाच्या संसर्गाचे चक्र थांबवण्यासाठी जनता कर्फ्यूची मोदींची आयडिया खरोखरच उत्कृष्ट होती. पण त्यात त्यांनी जी प्रोत्साहनाची फोडणी दिली त्याने सगळा विस्कोट करून टाकला. जे व्हिडीओ पाहण्यात आले त्यांचा विचार केला तर मोदींनी जर प्रोत्साहनाची टुम आणली नसती तर किती बरे झाले असते!

  • संदीप बंधुराज

कोरोनाचा जागतिक इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा त्यात ‘ गो कोरोना, कोरोना गो’ चा नारा देत कोरोना विरोधात भारतीयांनी पुकारलेल्या लढ्याची खास नोंद घेतली जाईल. रामदास आठवले यांना याचे खरे तर श्रेय दिले पाहिजे. तेच या मूलमंत्राचे निर्माते आहेत. त्यांनीच सर्वप्रथम हा नारा दिला, लढा पुकारला. त्यांनी हा असा पाया रचल्यानंतर कोरोनाच्या विरोधात लढ्याची जणू स्पर्धाच निर्माण झाली. कोणी गोमूत्र, कुणी गोशेण, लसणाच्या पाकळ्या, गरम पाणी तर  कुणी कबुतराचा कोठा वगैरे वगैरे उपाय सूचविले, ते अगदी थेट घंटोपोलॉजीपर्यंत येवून पोहोचले, पण घोषणा तीच ‘गो करोना! रविवारी घंटोपंथी जनतेने जे ‘राष्ट्रभक्ती’चे प्रदर्शन केले त्याने तर या लढ्याचा कळसच गाठला. अर्थात याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच दिले जाईल. त्यांनीच तर कळस गाठण्याची सुसंधी निर्माण करुन दिली.

 या दोन ‘राष्ट्रीय’ नेत्यांच्या कार्य करण्याच्या पद्धती ठरलेल्या आहेत. आठवले साहेब कोणताही मुद्दा अगदी कवितेच्या साच्यात बसवून साजरा करतात. तर मोदी साहेब कितीही गंभीर मुद्दा अगदी राष्ट्रभक्तीच्या साच्यात बसवून साजरा करतात. रविवारच्या घंटोपोलॉजीमागे तीच तर शैली होती!

कोरोनामुळे जगातील 192 देश हैराण झाले आहेत. त्यात भारतही आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. पण अनेक भारतीयांना त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. रविवारच्या ‘घंटोपोलॉजी’नंतर तर १३० कोटी लोकसंख्येच्या देशातील जनता तर तिच्या मूळ औकातीत आली. भारतीय माणूस कोणत्या गोष्टीचा उत्सव साजरा करेल हे सांगता येत नाही. त्याला फक्त संधी हवीय. तंगड्या उडवायला. कोरोनाने माणसे मरत आहेत आणि तरीही माणसे टाळ्या वाजवून, घंटा बडवून आणि थाळ्या चेपवून डॉक्टर्सना प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली रस्त्यावर धिंगाणा घालत होती, हे चित्र पाहून खरेच आपण किती वेड्या आणि मूर्ख लोकांमध्ये राहतोय याचे दु:खच अनेक सुज्ञांना झालेही असेल.

या गंभीर प्रसंगी इच्छा नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार मानावे लागत आहे. त्यांना एक तर भारतीय माणसाची मानसिकता लक्षात आली नाही किंवा त्यांनी ही मानसिकता लक्षात घेवूनच ‘घरघर मोदी’ पोहोचवण्यासाठी ही नामी शक्कल लढवली असावी. ( कारण त्यानंतर भक्तांचे ‘घर घर मोदी’ चे संदेश फिरु लागले आहेत). पंतप्रधानांच्या आतापर्यंतच्या किर्तीला शोभेसेच हा इव्हेंटही साजरा करण्याचे आवाहन केले गेले आणि माकडांच्या हाती आयतेच कोलित सापडले.

कोरोनाच्या संसर्गाचे चक्र थांबवण्यासाठी जनता कर्फ्यूची मोदींची आयडिया खरोखरच उत्कृष्ट होती. पण त्यात त्यांनी जी प्रोत्साहनाची फोडणी दिली त्याने सगळा विस्कोट करून टाकला. जे व्हिडीओ पाहण्यात आले त्यांचा विचार केला तर मोदींनी जर प्रोत्साहनाची टुम आणली नसती तर किती बरे झाले असते असे वाटल्याशिवाय राहत नाही. शिकली सवरलेली माणसे दिवसभर कमवलेले गमवताना दिसत होती. रामदास आठवलेंनी ‘कोरोना गो’चा नारा दिल्यापासून ते चेष्टेचा विषय बनले होते. पण नागरिकांनी तोच पाया ठेवून पंतप्रधानांचा शब्द पाळण्याच्या नावाखाली कळसच केला. पंतप्रधानांनी त्याबाबत चिंता व्यक्त केली खरी, पण आता वेळ निघून गेली आहे. असे सांगतात की, शिवाजी महाराजांनी एका पत्रात लिहून ठेवलेय की, ‘राजाने गावात कधी मिरचीचे पान तोडू नये. कारण तसे केले तर मागून येणारे सैन्य सगळे शेतच कापून टाकेल!’ आपल्या सैनिकांनी काल काय केले हे आपण पाहिलेच आहे!

सोमवारी, दुसऱ्या दिवशी तर शिकल्या सवरलेल्या लोकांनी पुन्हा रस्त्यावर गर्दी केली. मुलूंड टोल नाक्यावर तर गाड्यांच्या रांगाच दिसल्या. भाजी बाजारात गर्दी उसळली आणि कोरोना संसर्गासाठी पूरक वातावरण निर्माण करण्यात आले. सर्व काही सरकारनीच करावे असं वाटते की काय या लोकांना? कळत नाही! केंद्र सरकार, राज्य सरकार कोरोनावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जनता गांभीर्याने घ्यायला तयारच नाहीय हेच यातून दिसत आहे. शेवटी सरकारला संचारबंदी लावावी लागली. एवढे वैचारिक अध:पतन झालेय जनतेचे! जनतेनs आता कळसच गाठला आहे हे खरे; पण याचा पाया नेतृत्वाने रचला हे विसरता येत नाही!

कोरोनाचा इतिहास लिहिला जाईपर्यंत किती बळी जातील हे सांगणे कठीण आहे पण त्याला हे पाया रचणारे आणि कळस गाठणारे दोघेही जबाबदार मानले जातील!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा