एकवीस दिवसांचा बंदीवास !

0
64

अनेक गावांनी, जिल्ह्यांनी आपल्या सीमा सील केल्या आहेत.  कुणाही बाहेरच्या व्यक्तीला किंवा गावातीलच पण शहरातून परतणाऱ्या व्यक्तीलाही ते गावात येवू देत नाहीत. यायचेच असले तर तपासणी करूनच घेतात. अशावेळी शहरात राहणारी शिकली सवरलेली माणसे मुर्खासारखी का वागत आहेत? हातावर पोट असलेल्यांचे समजू शकतो पण ज्यांची पोटं सुटलेली आहेत त्यांचा मेंदूवरचा ताबा का सुटलाय?

  • संदीप बंधुराज

जगातील सर्वेात्तम आरोग्यसेवा असलेल्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला केवळ सहा कोटी लोकसंख्या असलेला इटली हा देश कोरोनापुढे पुरता आडवा झाला आहे. भारताची लोकसंख्या १३० कोटी आहे. आरोग्यसेवेच्या यादीत जगात ११२ व्या क्रमांकावर आहे. जेथे कोरोनापुढे इटली आडवी झाली तेथे भारताची काय अवस्था होईल, हे लक्षात घ्यायला हवे. सरकार आपल्या परिने सर्व प्रयत्न करताना दिसत आहेत.  मात्र ज्या जनतेच्या जीवासाठी हे चाललंय त्या जनतेला खरेच याचे काही गांभीर्य आहे का? महाराष्ट्रातच नव्हे तर देशात ठिकठिकाणी अशा मुर्ख नागरिकांचे दर्शन झाले. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लागणाऱ्या सुविधा व मनुष्यबळ यांचा आधीच तुटवडा आहे. अशावेळी नागरिकांकडून काही पथ्य पाळण्याची गरज आहे. कोरोना होण्यापूर्वी आपण त्याला रोखू शकतो, ही खूप मोठी शक्ती आहे. म्हणूनच सरकारांनी ‘घरातून बाहेर पडू नका’ असा संदेश नागरिकांना दिला आहे. मात्र अनेक शिकले सवरलेले लोक सर्रास बाहेर पडताना आजही दिसले. नागपूरच्या सिव्हिल लाइन्समध्ये काय कमी शिकलेले लोक राहतात? तेथील काही दीडशहाणे तर आज मॉर्निंग वॉकसाठी ग्रुप्सनी बाहेर पडले होते. पोलिसांनी हात जोडूनही थांबले नाहीत. पिलिभीतीमधील आयएएस डीएम व आयपीएस एसपी हे अधिकारी रॅली काढून शंखनाद व घंटानाद करताना दिसले. हे खरोखरच बौद्धीक दिवाळखोरीचे लक्षण आहे. आजही कोरोना आटोक्यात आहे. विचार करा जर तो शहरांतील झोपडपट्टयांत घुसला तर काय होईल? अनेक गावांनी, जिल्ह्यांनी आपल्या सीमा सील केल्या आहेत.  कुणाही बाहेरच्या व्यक्तीला किंवा गावातीलच पण शहरातून परतणाऱ्या व्यक्तीलाही ते गावात येवू देत नाहीत. यायचेच असले तर तपासणी करूनच घेतात. अशावेळी शहरात राहणारी शिकली सवरलेली माणसे मुर्खासारखी का वागत आहेत? हातावर पोट असलेल्यांचे समजू शकतो पण ज्यांची पोटं सुटलेली आहेत त्यांचा मेंदूवरचा ताबा का सुटलाय?

प्रधानमंत्री मोदी यांनी मंगळवारी जे आवाहन केले ती खरतर कळकळीची विनंतीच होती. पहिल्यांदा त्यांच्या बोलण्यात सच्चाई झळकली. अगामी महासत्ता असल्याचा परिचित असा वृथा अभिमान नव्हता. नाईलाज म्हणून २१ दिवसांचा लॉकडाऊन करावा लागला आहे. मी तर म्हणतो सरकारने यापुढे जावून आणखी कडक पावले उचलायला हवीत. जो कुणी विनाकारण रस्त्यावर येईल त्याला चांगलेच चोपायला हवे. अगदी रँडसारखे धोरण राबवले तरी हरकत नाही. रँड हा भारतीय इतिहासातील खलनायक. त्याने प्लेगच्या काळात टिळक आदींचा विरोध डावलून लसीकरणाची मोहीम राबविली होती. त्यात केलेल्या अतिरेकामुळे त्याचा बळी गेला. ती गोष्ट वेगळी. पण तेवढा अतिरेक वगळता सरकारने रँडप्रमाणे पावले उचलली पाहिजेत असेच वाटते. या पढतमुर्खांचे घातकी वर्तन पाहून ही माणसे म्हणजे मानवी बॉम्बच आहेत जणू!

किमान या काळात तरी सर्वच नागरिकांनी राजकीय, सामाजिक वा आर्थिक असा कोणताही भेद न बाळगता आलेल्या संकटाचा मुकाबला करायला हवा. काही भक्त मंडळीने याही काळात विषारी प्रचार सुरु ठेवलेला आहे. एका धर्माला टार्गेट करणारे संदेश अजूनही सुरु आहेत. काहींनी याही परिस्थितीत मोदींचा प्रचार सुरु ठेवला आहे. तर काहींनी मोदींचा विरोध सुरुच ठेवला आहे. हे सर्व करण्याची ही आता वेळ नाहीय. आपले सरकार, पोलिस यंत्रणा, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील सर्व नागरिक यांच्या पाठीशी उभे राहण्याची ही वेळ आहे. काही व्यापाऱ्यांनी तर लोकांची गैरसोय लक्षात घेवून भाववाढ केली आहे. मुंबईमध्ये पाच लाख मास्क पकडण्यात आले. ही व्यापारी मंडळी मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाणारीच आहेत.

आता देशाला अत्यंत गंभीर परिस्थितीत २१  दिवसांचा बंदीवास भोगावा लागणार आहे. माझ्यासारखी माणसे जी घरापासून खूप दूर एकटी आहेत, त्यांची मानसिक अवस्था बिकट होणार आहे. ( माझ्याकडे ‘पुस्तक’ नावाचा मित्र असल्याने मला थोडा कमी ताण राहील) त्यांच्यासाठी तर हा काळ खूपच तणावाचा असणार आहे. घरी काही घडले तरी धावूनही जाता येणार नाही. जे आजारी आहेत, गरोदर आहेत, जे मूळातच आर्थिक संकटात आहेत, ज्यांचे पोटच रोजच्या रोज मिळणाऱ्या रोजगारावर चालते त्यांनाच नाही तर जे स्वत:च्या कुटूंबात आहेत, ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे, जे निरोगी आहेत अशा सर्वच लहान-थोरांसाठी हा बंदीवास भयंकर असणार आहे. पण कोरोनाचा महाभयंकर प्रकोप टाळण्यासाठी तेवढे तरी सहन करावेच लागणार आहे. आपण सर्वांनीच हा निर्धार करुया. सर्वांना हा २१ दिवसांचा बंदीवास सहन करण्याची ताकद प्राप्त होओ  आणि एकदा कोरोना नावाचे संकट टळो एवढीच सदिच्छा ! बाकी प्रधानमंत्री जे म्हणाले तेच ‘जान है तो जहान है’! 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा