औरंगाबादेत विनामास्क फिरणाऱ्यांना रोख दंडासह मिळणार मास्क!

0
433

औरंगाबाद औरंगाबादेतील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध आता रोख स्वरूपातील दंडाची कारवाई करण्यात येणार असून त्यांना दंड आकारणीबरोबरच मास्कही दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात दर सोमवारी लोकप्रतिनिधी समवेत कोरोना आढावा बैठक घेण्यात येते. आज आयोजित अशाच बैठकीत ते बोलत होते. बैठकीला खा. इम्तियाज जलील, खा. भागवत कराड,  आमदार अतुल सावे, आ. अंबादास दानवे, आ. प्रदीप जैस्वाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, महानगरपालिकेचे उपायुक्त रविंद्र निकम, मनपाच्या आरोग्य अधिकारी डाँ. निता पाडळकर आदीची उपस्थिती होती.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार ग्रामीण भागात वाढत आहे. या प्रसाराच्या अटकावा करिता जिल्ह्यात  बाजार भरणाऱ्या १३ गावात तत्काळ कोरोना चाचणी करण्यात येणार असून, या चाचणीमुळे कोरोना विषाणुच्या प्रसारास आळा बसेल, असे चव्हाण म्हणाले.

कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागात मोठया प्रमाणात पसरत असून जिल्हृयातील १३ बाजार भरणाऱ्या गावात कोरोना तपासणी केल्याने कोरोना विषाणुच्या प्रसारास प्रतिबंध होईल असा विश्वास व्यक्त करुन चव्हाण म्हणाले की, शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना रोख स्वरुपातील दंडासह मास्क देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात ६ हजार ३०२ , तर शहरात १३ हजार ८४७ रुग्ण आहे. जिल्ह्यातील एकूण रूग्णसंख्या २१ हजार १४९ आहे. यापैकी ७४. ०३ टक्के रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, असे चव्हाण म्हणाले.

ऑटोरिक्षाही सुरू कराः खा. इम्तियाज जलील यांनी राज्यात ज्याप्रमाणे बससेवा सुरु करण्यात आली याच धर्तीवर ऑटोरिक्षा, चालू करण्याची मागणी केली. तर आमदार अंबादास दानवे, आ. अतुल सावे, प्रदीप जैस्वाल यांनी नागरिक हर्सुल तलाव, हिमायत बाग येथे पर्यटनासाठी गर्दी करत असून मनपाकडून दंडात्मक कारवाईचे फलक लावण्याच्या सूचना एकमताने केली.

हँडग्लोजचा पुनर्वापर नकोः आमदार अंबादास दानवे यांनी वैद्यकीय कचऱ्यांची विल्हेवाट योग्य पध्दतीने करुन, वापरात येणारे मास्क आणि हॅण्डग्लोजचा पुर्नवापर होऊ नये याकरिता कडक तपासणीच्या सूचना केल्या तर काही ठिकाणी कोविड केअर सेंटरमध्ये अधिक सुविधा पुरवण्याच्याही सूचना केल्या तर आ. जैस्वाल यांनी खाजगी डॉक्टर रुग्णांना तत्काळ सेवा देण्यास कमी पडत असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा