दिव्यांग कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन काळात कार्यालयीन उपस्थितीत सूट

0
60
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबई :  राज्य सरकारमधील सर्व कार्यालयांत सेवा देत असलेल्या दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनच्या काळात कार्यालयीन उपस्थितीतून सूट देण्यात आली आहे. राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेनेही याबाबत मागणी केली होती. त्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा केला होता.

सामान्य प्रशासन विभागामार्फत याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला असून सर्व शासकीय कार्यलयातील दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता उपस्थितीतून सूट देण्यात आली आहे. सामान्य व्यक्तीच्या तुलनेत दिव्यांग व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. अशा वेळी कोरोनासारख्या महाभयंकर आजाराची लागण होण्याची भीती अधिक असते. राज्यात लागू असलेल्या संचारबंदीमुळे वाहतूक व दळणवळणाच्या अडचणीही आहेत. याच पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अशा सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयात उपस्थित राहण्यातून लॉकडाऊनच्या काळात सूट द्यावी अशी आग्रही मागणी केली होती.

सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या अपंग आयुक्तालयामार्फतही याबाबतही यासंबंधी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करत सोमवारपासून सर्व कार्यालयातील दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्याना लॉकडाऊन संदर्भात पुढील आदेश येईपर्यंत उपस्थित राहण्यापासून सूट जाहीर केली आहे. या निर्णयासह यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंडे व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा