औरंगाबादेत खासगी रुग्णालयांतील गरीब रुग्णांना मिळणार २,३६० रुपयांत रेमडिसिवीर इंजेक्शन!

0
62

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात रेमडिसिवीर इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून खासगी रुग्णालयांमध्ये दाखल  असलेल्या गरीब रूग्णांना अन्न औषध प्रशासनामार्फत २ हजार ३६० रुपये या सवलतीच्या दरात हे इंजेक्शन उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी समवेतच्या कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी चव्हाण बोलत होते. बैठकीला खा. इम्तियाज जलील, खा. डॉ. भागवत कराड, आ. हरिभाऊ बागडे, आ. संजय शिरसाठ, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे, यांच्यासह पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले,  अन्न औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे, घाटी रुग्णालयाचे डॉ. झीने, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर, जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. सुंदर कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’  मोहिमे प्रभावीपणे राबवण्यात येत असून या अंतर्गत संसर्ग टाळण्यासाठीचे मार्गदर्शन आणि संशयितांची तपासणी व त्यांना आवश्यक उपचार  तातडीने देण्यात येत आहे. त्याप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यातही कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवण्यात येणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे नव्वद टक्क्यांच्या वर पोहचले असून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ या मोहिमेच्या सर्वेक्षणातून विविध आजारांची लक्षणे असलेल्या एक लाख लोकांची माहिती प्राप्त झाली आहे. त्या लोकांच्या प्राधान्याने तातडीने आटीपीसीआर चाचण्या करण्यात येणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

नुकसानीचे पंचनामे तातडीने कराः यावेळी जिल्ह्यात अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्याबाबतचे पंचनामे तातडीने पूर्ण करुन शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य मिळण्यासाठी त्याचा अहवाल  वेळेत शासनाला सादर करावा तसेच विमा कंपन्यांनाही त्याबाबत वेळेत कळवावे, असे सर्व उपस्थित लोकप्रतिनिधींनी सूचित केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा