कोरोनामुळे झालेला विनाश विषमतामूलक, गरिबांना श्रीमंतांसाठीचे उपचार द्याः साहित्यिकांची मागणी

0
134
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबईः कोरोना ही केवळ रोगाची साथ नसून सामाजिक आणि आर्थिक भूकंपही आहे. यातून झालेला विनाश विषमतामूलक असून सगळ्यांना निशुल्क उपचार उपलब्ध व्हावेत आणि देशातील सगळ्यात गरीब माणसालाही सगळ्यात श्रीमंत आणि वजनदार माणसाकरिता उपलब्ध असलेले उपचार मिळावेत, अशी मागणी महाराष्ट्रातील सुमारे ५२ साहित्यिक, विचारवंतांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

आजच्या या महासंकटाच्या काळात घडणाऱ्या शोककारक घटनांनी आम्ही लेखक शोकाकुल व उद्विग्न मनाने हे निवेदन देत आहोत. सगळा देशच नव्हे तर सारे जग गेल्या काही महिन्यांपासून नैसर्गिक आपत्तीने ग्रासले गेलेले आहे. अभूतपूर्व अशा साथीच्या रोगाने झालेल्या लाखो लोकांच्या अकाली मृत्यूने आणि सगळीकडे पसरलेल्या आजाराने सारे जग विस्कळीत झालेले आहे. ही केवळ रोगाची साथ नसून हा सामाजिक आणि आर्थिक भूकंपदेखील आहे. यातून झालेला विनाशही विषमतामूलक आहे हे विसरता कामा नये. मानवी इतिहासातील सगळ्यात दारूण घटना असेच या काळाचे वर्णन करावे लागेल, असे या साहित्यिक विचारवंतांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटल आहे.        

ही आपत्ती मानवनिर्मितच!: या संकटामुळे कोट्यवधी लोक विस्थापित झालेले आहेत. भूकेने तहानेने व्याकूळ होऊन बेघर आणि बेरोजगार झालेल्या लाखो लोकांनी आपापल्या घरी, आपल्या गावी परतण्याकरता हजारो किलोमीटर पायी प्रवास केला आहे. आम्ही हे सगळे उघड्या डोळ्यांनी बघितलेले आहे. अशी भीषण परिस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधी मानवजातीवर आलेली नाही. मात्र ही भीषण परिस्थिती नैसर्गिक आपत्ती नव्हती. ही आपत्ती आपण निर्माण केलेली आहे हे विसरता कामा नये. या महासंकटामुळे कोट्यवधी लोक बेरोजगार झालेले आहेत. त्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. संकटात सापडलेल्या आपल्या लोकांवर आपण नीट उपचारही करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भेदभाव आणि विषमता असलेला समाज आपणच निर्माण केला आहे, हे या संकटाने दाखवून दिलेले आहे. आपण ज्या प्रकारे सोबतच्या माणसांसोबत वागतो तसेच निसर्गासोबतही वागत आहोत हे देखील यातून दिसून येत आहे, असे या साहित्यिक- विचारवंतांनी म्हटले आहे.

हे निवेदन देणाऱ्यांमध्ये सुधीर रसाळ, रामदास भटकळ, महेश एलकुंचवार, ना. धों. महानोर, निशिकांत ठकार,  रा. रं. बोराडे, वसंत आबाजी डहाके, चंद्रकांत पाटील, रंगनाथ पठारे, सतीश काळसेकर, वसंत दत्तात्रय गुर्जर, प्रभा गणोरकर, अरुण खोपकर, वसंत पाटणकर, दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी, कौतिकराव ठाले पाटील, मकरंद साठे, राजन गवस, जयंत पवार,  लक्ष्मीकांत देशमुख, सतीश तांबे, जयदेव डोळे, सुनील तांबे, अनुराधा पाटील, प्रफुल्ल शिलेदार,  प्रवीण बांदेकर,गणेश विसपुते, आसाराम लोमटे, प्रज्ञा दया पवार, रमेश इंगळे उत्रादकर, नीरजा, नितीन रिंढे, किशोर कदम, रणधीर शिंदे, श्रीधर नांदेडकर, अजय कांडर, अविनाश गायकवाड, संजय आर्वीकर, प्रकाश होळकर, प्रमोद मुनघाटे, दिनकर मनवर, संध्या नरे-पवार, दिलीप धोंडगे, प्रकाश किनगावकर, दिलीप चव्हाण, गोरख थोरात, राजा होळकुंदे, गौतमीपुत्र कांबळे, रामचंद्र काळूंखे, रवी कोरडे, संदीप जगदाळे यांचा समावेश आहे

साहित्यिक- विचारवंतांनी केलेल्या सूचनाः

  • सगळ्यांना निशुल्क उपचार उपलब्ध व्हावेत. देशातल्या सगळ्यात गरीब माणसालाही तेच उपचार मिळावे जे देशातल्या सगळ्यात श्रीमंत आणि वजनदार माणसाकरिता उपलब्ध असतात.
  • सरकारी दवाखान्यांची संख्या आणि दर्जा वाढवण्यात यावा. वैद्यकीय सेवांचे राष्ट्रीयीकरण व्हावे. वैद्यकीय विम्यावर अवलंबून असणे बंद करावे. स्वास्थ्य आणि शिक्षण याकरता सगळ्यात जास्त खर्च करण्यात यावा आणि या सेवा कुठल्याही भेदभावाशिवाय सगळ्यांकरता उपलब्ध असाव्या.   
  • रोजगाराचा अधिकार हा मूलभूत अधिकार मानला जावा.
  • प्रत्येकाने आपला घास आजूबाजूच्या लोकांसोबत वाटून खावा.
  • प्रत्यक लेखकाने आपल्याला मिळालेले मानधन तसेच आपल्या उत्पन्नाचा जास्तीत जास्त  भाग सहायता निधीस आणि सहायता करणाऱ्या स्वयंसेवी संघटनांना द्यावा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा