औरंगाबादः परदेश दौरा करून परतलेल्या एका महिला रूग्णाला कोरोनाची बाधा झाल्यामुळे काळजीत पडलेल्या औरंगाबादकरांसाठी खुश खबर आहे. या महिला रूग्णावरील उपचारानंतर तिचा घशातील द्रावाचा (स्वॅब) तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या २१ जणांच्या स्वॅब तपासणीचे अहवालही निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.
रशिया आणि कझाकिस्तानातून प्रवास करून आलेल्या या ५९ वर्षीय महिलेला कोरोना विषाणुचा संसर्ग झाल्याचे १५ मार्च रोजी राष्ट्रीय विषाणु संस्थेच्या (एनआयव्ही) स्वॅब तपासणी अहवालात स्पष्ट झाले होते. या महिलेला १३ मार्च रोजी एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाधित देशातून आल्यामुळे तिच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले.
उपचारानंतर या महिलेचा स्वॅब पुन्हा एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. तो निगेटिव्ह आला आहे. याचबरोबर या महिलेच्या संपर्कात आलेल्या २१ जणांच्या स्वॅब तपासणीचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. औरंगाबादकारांच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब असली तरी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे व घराबाहेर न पडणे आदि खबरदारीच्या उपाययोजना पुढील काही दिवस कराव्या लागणार आहेत.