२० लाख कोटींचे पॅकेज, लॉकडाऊन-४ ची घोषणा; मोदी म्हणालेः एक उद्या कळेल, दुसरे १८ मेपूर्वी!

0
747

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना स्वावलंबी भारत अभियांनाची घोषणा करतानाच २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. १७ मे रोजी संपणारे लॉकडाऊनही वाढणार असल्याचे सांगताना हे लॉकडाऊन पूर्णपणे नव्या स्वरूपाचे असेल, असे मोदी म्हणाले. मात्र २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे स्वरूप काय असेल, हे उद्या कळेल आणि १८ मेपासूनचा लॉकडाऊन कसा असेल, हे १८ मेपूर्वी कळेल, असे मोदी म्हणाले.

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मोदी यांनी आज २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज आपल्या लघु, मध्यम उद्योगांसाठी आहे. हे पॅकेज देशवासियांसाठी रात्रंदिवस परिश्रम करणाऱ्या श्रमिक आणि शेतकऱ्यांसाठी आहे. हे पॅकेज त्या वर्गासाठी आहे, जो दिवसरात्र मेहनत करतो आणि प्रामाणिकपणे कर देतो. अर्थमंत्री याबाबत १३ मे रोजी तपशीलवार माहिती देतील, असे मोदी म्हणाले.

मोदींनी लॉकडाऊन-४चीही घोषणा केली. लॉकडाऊनचा चौथा टप्पा पूर्णतः नवीन रंग-रूप, नवीन नियमांचा असेल. राज्यांकडून आम्हाला सूचना मिळत आहेत. त्या आधारावर लॉकडाऊन-४ बाबतची माहिती आपणाला १८ मेपूर्वी दिली जाईल, असे मोदी यांनी या संबोधनात सांगितले.

संपूर्ण जग २१ वे शतक भारताचे असेल असे सांगत होते. आपण गेल्या शतकापासून २१ वे शतक भारताचे असल्याचे ऐकत आहोत. कोरोनाच्या संकटानंतरही जगात जी स्थिती निर्माण होत आहे, ती आपण पहात आहोत. २१ वे शतक भारताचे व्हावे हे आपले स्वप्न नाही तर जबाबदारीही आहे. जगाची आजची स्थिती पाहता स्वावलंबी भारत हाच एकमेव मार्ग आहे, असेही मोदी म्हणाले.

‘मीडियाला हेडलाइन दिली, देशाला मदतीच्या हेल्पलाइनची गरज’:  मोदींच्या या संबोधनावर काँग्रेसने हल्लाबोल चढवला आहे. मोदीजी, आपल्या संबोधनातून मीडियाला बातमी चालवण्यासाठी ‘हेडलाइन’ तर दिली, परंतु देशाला ‘मदतीच्या हेल्पलाइन’ची प्रतीक्षा आहे. आश्वासनापासून वस्तुस्थितीचा प्रवास पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे.  घरवापसी करत असलेल्या लाखो मजूर बांधवांना दिलासा, जखमेवर मलम, आर्थिक सहाय्य आणि सुरक्षित घरी परतण्यासाठी मदतीची सर्वप्रथम गरज आहे. तुम्ही आज याबाबतची घोषणा कराल, अशी अपेक्षा होती. देश राष्ट्रनिर्माते मजूर आणि श्रमिकांप्रती तुमची निष्ठूरता आणि असंवेनशीलतेमुळे निराशा आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा