खासगी प्रयोगशाळेत स्वत:हून कोरोना चाचणीसाठी गेल्यास २ हजार ५०० रुपये शुल्क

0
24

मुंबई: खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी राज्य सरकारने २ हजार २०० व २ हजार ८०० रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र प्रयोगशाळेत थेट तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २ हजार ८०० रुपये न आकारता त्यांच्याकडून २ हजार ५०० रुपये घ्यावेत, असा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. मुंबईमध्ये आठवडाभरात ६५० रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच कोरोना चाचण्यांचे दर निश्चित केले. रुग्णालयातून रुग्णाचा स्वॅब घेतला त्यासाठी २२०० रुपये दर आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेऊन तपासणी केली तर त्याठी २५०० रुपये आकारायचे असा निर्णय झाला. मात्र काही व्यक्ती, रुग्ण स्वत: थेट प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करतात त्यांच्याकडून २८०० रुपये आकारले जातात. वास्तविक रुग्ण स्वत:हून आल्यावर प्रयोगशाळेला पीपीई कीटचा तसेच वाहतुकीचा खर्च येत नाही. अशा वेळी त्यांच्याकडून २ हजार ८०० रुपयांऐवजी २ हजार ५०० रुपये आकारावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी २ हजार २०० आणि २ हजार ८०० यामधला टप्पा म्हणून २ हजार ५०० रुपये राज्य सरकारने ठरवून दिले आहे.

मुंबईकरांना रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध व्हावी यासाठी नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये रुग्णवाहिकांची उपलब्धता असेल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या ५०० रुग्णवाहिका उपलब्ध असून ५० रुग्णवाहिका महिंद्रा समूहाकडून मिळाल्या आहेत तर आठवडाभरात १५० रुग्णवाहिका उपलब्ध होतील.  त्यामुळे मुंबईत ६५० रुग्णवाहिकांची सेवा मिळणार आहे. नागरिकांनी वॉर्डमधील वॉर रुमशी संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी नोंदवावी, ही सेवा नागरिकांना विनामूल्य मिळणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

मुंबईत आयसीयूचे ५०० बेडस् उपलब्ध होणार आहेत. त्यात आठवडाभरत अजून १०० ते १५० बेडस् ची भर पडणार आहे. सेंट जॉर्जेस, बीकेसी, सेव्हन हिल, वरळी डोम, येथे बेडस् वाढवण्यात येत आहेत. कांदीवलीतील राज्य कामगार विमा रुग्णालयात २५० बेडस् वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत त्यांच्या ऐवजी जे गंभीर आजारी आहेत, ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे. अशा गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात प्राधान्याने दाखल करून घेण्याविषयी सांगण्यात येत आहे. यासाठी ८० टक्के खाटा घेतलेल्या रुग्णालयांमध्ये एक अधिकारी नेमला जाईल तिथे मदतीसाठी कक्ष उभारला जाईल. लक्षणे नसलेल्या रुग्णांना थेट दाखल न करता गरजूंना दाखल करण्याविषयी हे अधिकारी समन्वय करतील, असे टोपे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा