हिंदू- मुस्लिम कोरोनाग्रस्तांसाठी रुग्णालयात वेगवेगळे वॉर्डः गुजरातेत भाजप सरकारचाच आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातेत भाजपचेच सरकार आहे आणि त्याच सरकारने धर्माच्या आधारावर भेदभाव करणारा हा आदेश जारी केला आहे.

0
160
प्रतिकात्मक छायाचित्र.

अहमदाबादः कोरोनाचा विषाणू धर्म बघून लोकांना संसर्ग करत नसला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृह राज्य असलेल्या गुजरातच्या अहमदाबादेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धर्माच्या आधारावरच कोरोना वार्ड बनवण्यात आले असल्याची धक्कादायक बातमी हाती आली आहे. या रुग्णालयात हिंदू कोरोनाग्रस्तांसाठी वेगळा वॉर्ड आणि मुस्लिम कोरोनाग्रस्तांसाठी वेगळा वॉर्ड तयार करण्यात आला आहे. सरकारच्या आदेशानुसारच असे वेगवेगळे वॉर्ड बनवण्यात आल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुणवंत एच. राठौड यांनी सांगितले. विशेष म्हणजे गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे आणि त्याच सरकारने हा भेदभाव करणारा आदेश काढला आहे.

द इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पीटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद एच. राठौड यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, सर्वसाधारणपणे पुरूष आणि महिला रुग्णांसाठी वेगवेगळे वॉर्ड असतात. परंतु आम्ही येथे हिंदू आणि मुस्लिम रुग्णांसाठी वेगवेगळे वॉर्ड तयार केले आहेत. धर्माच्या आधारावर हिंदू आणि मुस्लिमांसाठी असे स्वतंत्र वॉर्ड का? असे विचारले असता डॉ. राठौड म्हणाले की, हा सरकारचा निर्णय आहे. तुम्ही त्यांनाच विचारा. मात्र सरकारला याबाबत विचारले असता राज्याचे आरोग्य मंत्री नितीन पटेल यांनी आपणाला अशा कोणत्याही निर्णयाची माहिती असल्याचा इन्कार केला. याची चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले. अहमदाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही आपणाला याबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले.

रुग्णालयाच्या भरती शिष्टाचारानुसार संशयास्पद रुग्णांना कोरोना चाचणीचा अहवाल येईपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांपासून वेगळे ठेवण्यात येते. कोरोना विषाणू संसर्गामुळे या रूग्णालयात दाखल झालेल्या १८६ रुग्णांपैकी १५० रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. या १५० रुग्णांपैकी ४० रुग्ण मुस्लिम आहेत. देशभरातील अनेक रुग्णालयात  कोरोना विषाणू संसर्गाच्या उपचारासाठी पुरूष आणि महिलांसाठी वेगवेगळे वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. या शिवाय अन्य कुठल्याही आधारावर वेगवेगळे वॉर्ड तयार करण्यात आल्याचे वृत्त नाही. कोरोना संकटाच्या काळातही हिंदू-मुस्लिमांत भेदभाव करून त्यांच्यासाठी वेगवेगळे वॉर्ड बनवणारे गुजरात हे पहिलेच राज्य ठरले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा