ब्रिटनहून खास न्यूजटाऊनसाठीः भय इथेही मन खाते आहे, पण….

0
177

कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभर थैमान घातले आहे. ब्रिटनमध्ये तर पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनाच कोराना विषाणूची लागण झालेली आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटन सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या? ब्रिटनमध्ये कोरोनाचा संसर्ग उद्भवल्यानंतर नेमकी काय परिस्थिती आहे? याबाबत खास न्यूजटाऊनसाठी सांगताहेत थेट ब्रिटनहून उमर कमाल फारूकी….

  • उमर कमाल फारूकी (लेखक ब्रिटनच्या सेंट्रल लँकेशायर युनिर्व्हसिटीत बॅरिस्टर पदवीचे शिक्षण घेत आहेत.)

ब्रिटनमध्ये २१ मार्चला पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी लॉकडाऊनची अधिकृत घोषणा केली. त्यापूर्वी येथील सरकारने घरातच राहण्याची, घराबाहेर न पडण्याची  सूचना केली होती. मात्र २१ मार्च रोजी अधिकृत लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर घरातून अजितबात बाहरे न पडण्याची सक्ती केली. घराबाहेर पडायचेच असेल तर दिवसातून फक्त एकदा आणि तेही तुम्हाला काही जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करायची असेल  अत्यंत महत्वाचे काम असेल तरच!  त्याशिवाय जर कुणी घराबाहेर पडलेच तर त्याला ६० पाऊंड म्हणजेच सहा हजार रूपये दंड आणि अटकेची तरतूद असलेला कायदाही मंजूर केला. अशा पद्धतीने ब्रिटनमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केली आहे. ब्रिटनमधील सर्व शाळा, महाविद्याविद्यालये, विद्यापीठे, दुकाने, मॉल्स सर्व काही बंद करण्यात आली आहेत. फक्त दैनंदिन गरजेच्या वस्तू जेथे मिळतात, अशी फक्त सुपर मार्केट्स सुरू आहेत. तेथेही सोशल डिस्टन्सिंग सक्तीने पाळले जात आहे. तेथे तुम्हाला हात सॅनिटाइस करावे लागतात. दोन व्यक्तींमध्ये किमान दोन मीटरचे अंतर राखावे लागते. एका सुपर मार्केटमध्ये ६० लोकांपेक्षा जास्त लोक एकावेळी येऊ शकत नाहीत. सुपर मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत. त्यांची पेट्रोलिंग सुरू आहे. सुपर मार्केटमधून बाहेर पडलेल्या व्यक्तीकडे जर शॉपिंग बॅग, खरेदी केलेल्या ग्रोसरीच्या वस्तू नसतील तर त्याला थेट दंड आकारला जाऊ लागला आहे. या पद्धतीने येथे अंमलबजावणी सुरू आहे. इथेही लोकांच्या मनात भय आहे. धास्ती आहे…पण त्यासोबतच एक निर्धारही आहे… निग्रहाने या संकटातून बाहेर पडण्याचा!

येथे एक मोठा वर्ग वर्किंग नोकरीपेशा आहे. त्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. ज्यांना मधुमेह किंवा अन्य कोणता थोडाही आजार असेल तर त्यांना १२ आठवडे घरीच राहून काम करण्यास सांगण्यात आले आहे. कार्यालयात न येण्यास बजावण्यात आले आहे.

जेवढ्या खासगी कंपन्या आहेत, त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू नये, असे सांगण्यात आले आहे. या खासगी कंपन्यात जेवढेही कर्मचारी आहेत, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जी आर्थिक परिस्थिती उद्भवली आहे, ती पाहता या सर्व कर्मचाऱ्यांचे ८० टक्के वेतन सरकार देईल, असेही सांगण्यात आले आहे. अशा सर्व सुविधा येथील सरकार नागरिकांना देत आहे. ज्या लोकांनी कर्जे घेतली आहेत, त्यांना तीन महिने कर्जाचे हप्ते भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. तीन महिने हप्ते न भरल्यास बँका त्यांना दंड आकारणार नाहीत की कारवाई करणार नाहीत, असे सक्तीचे आदेश ब्रिटिश सरकारने जारी केले आहेत. ब्रिटनमध्ये राहणारे जे भाडेकरू आहेत, त्यांच्याही साठी सरकारने घरमालकांना आदेश जारी केला आहे. भाडेकरूंना तीन महिने भाडे देण्याची सक्ती करू नये किंवा भाडे दिले नाही म्हणून घराबाहेर काढू नये, असे घरमालकांना बजावण्यात आले आहे. मी एक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहे. भारतातून बॅरिस्टर होण्यासाठी लॉचे शिक्षण घेण्यासाठी मी येथे आलेला आहे. मी इथल्या पंतप्रधानांना एक पत्र लिहून ब्रिटनच्या धोरणात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडेही लक्ष देण्याची विनंती केली आहे.

 विशेष म्हणजे कोरोना विषाणुच्या धास्तीमुळे ब्रिटिश नागरिक जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी करून ठेवत होते. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे बाहेरच्या देशातून ब्रिटनमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. त्यामुळे आम्ही पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्याकडे ही मागणी केली. बँकिंगच्या समस्या येत आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी घरमालकांना भाडे देऊ शकत नाहीत. त्यामुळे ब्रिटनची जी ‘ नो इव्हिक्शन पॉलिसी’ आहे ती आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनाही लागू करावी आणि विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, असा आग्रह आम्ही धरला आहे. ही सुविधा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यांसाठी नव्हे तर सहा महिन्यांसाठी द्यावी, अशी मागणी आम्ही पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्याकडे केली आहे.

ब्रिटनमध्ये एक निसाऊ नावाची विद्यार्थी संघटना आहे, ती खूपच चांगले काम करत आहे. ब्रिटनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी ती ब्रिटनमधील भारतीय दूतावासाशी समन्वय साधत आहे. भारतात सर्व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे जगभरात जेथे जेथे भारतीय विद्यार्थी आहेत, ते तेथच अडकून पडलेले आहेत. तिच परिस्थिती ब्रिटनमध्येही आहे. त्यामुळे ब्रिटनमधील आम्ही भारतीय विद्यार्थी व्हॉट्सअप, ट्विटरसारख्या सोशल मीडियातून सोशल कनेक्ट ठेवून आहोत. कारण एकटे पडल्यामुळे डिप्रेशनमध्ये जाण्याची भीती आहे. ग्रुप व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून आम्ही एकमेकांशी संपर्क ठेवून आहोत.

इथे बाहेर कोणीही निघू शकत नाही. ज्या लोकांची प्रकृती नाजूक आहे, जे वयोवृद्ध आहेत अशा १५ लाख लोकांना पत्र लिहून ब्रिटिश सरकारने घरातच राहण्याची सक्ती केलेली आहे. ते कोणत्याही परिस्थिती घराबाहेर पडू शकत नाहीत. त्यांना घरातच रहावे लागत आहे. त्यांच्यासाठी सरकारने खास मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यांनी कशा पद्धतीने काम करायचे, जीवनशैली कशी ठेवायची, याबाबींचा त्यात समावेश आहे. येथील सर्व लोक सरकारच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करत आहेत.

येथे ब्रिटनमध्ये राहून आम्ही भारतातील परिस्थितीवरही लक्ष ठेवून आहोत. जनता कर्फ्यू यशस्वी झाला ही सर्वात चांगली गोष्ट आहे. इटली आणि अन्य देशांनी जे दुर्लक्ष केले आहे, ती चूक आपल्याकडून होऊ नये. आम्हाला जी माहिती मिळत आहे, त्यावरून महाराष्ट्र सरकारने जी पावले उचलली आहेत, ती प्रशंसनीय आहेत. त्याचे कौतुक केलेच पाहिजे. भारतात आरोग्यविषयक सोयीसुविधांची वाणवा आहे. संरक्षणात्मक उपकरणांची कमी आहे. ही उणीव कशी भरून काढता येईल, यावर केंद्र आणि राज्य सरकारने विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे. अमेरिका, ब्रिटन यासारख्या प्रगत देशांतच जर हेल्थ क्रायसेस होत असेल तर आपल्याकडे काय अवस्था होईल,याची तुलना करून आपण खबरदारी घेतलेली बरी!

ब्रिटनमधील नागरिक सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करत आहेत. घरात रहा म्हटले की घरातच राहत आहेत. आपल्याकडील नागरिकांची मानसिकता आणि ब्रिटिश नागरिकांच्या मानसिकतेतील हाच एक महत्वाचा फरक आहे. आम्हाला इथे राहून भारतातील जी काही माहिती मिळते आहे, त्यावरून आपल्याकडील लोक कोरोना विषाणुचा संसर्ग आणि सरकारने घोषित केलेला लॉकडाऊन अद्यापही फारसे मनावर घेताना दिसत नाहीत. इटली आणि स्पेनने नेमक्या याच चुका केल्या आहेत. त्या चुकांचे परिणाम आज ते भोगत आहेत. आपल्याही वाट्याला ती परिस्थिती येऊ नये, असा निर्धार भारतीय नागरिकांनी, महाराष्ट्राच्या जनतेने करावा आणि ‘कुछ नही होता…’ ही मानसिकताच लॉकडाऊन करायला हवी!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा