मुंबईत गर्दी नियंत्रणासाठी एसआरपीएफची मदत, दाट लोकवस्तीत होणार ड्रोनद्वारे निर्जंतुकीकरण

0
68
संग्रहित छायाचित्र.

मुंबई :  मुंबईच्या दाट लोकवस्तीच्या भागात लॉकडाऊन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि निर्जंतुकीकरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महापालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत. या भागात लॉकडाऊनचे पालन सक्तीने करण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्यातही गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्याच्या मुद्यावर विशेष उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर होत असलेली वाढ काळजी वाढवणारी असून याबाबत मुंबईचे लोकप्रतिनिधी जे मंत्रिमंडळातील सदस्य आहेत, त्यांनी त्यांची निरीक्षणे मांडली. गर्दी आणि दाटीवाटीच्या ठिकाणी संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले.

दाटीवाटीच्या ठिकाणी लॉकडाऊनचे पालन सक्तीने झाले पाहिजे. ते अधिक प्रभावीपणे होण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्याबाबत गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दल तैनात करण्यात यावे, असा आग्रहही धरण्यात आला.

गर्दीचे नियंत्रण महत्त्वाचे असून आता त्यासाठी नियंत्रण कक्षाच्या मदतीने सीसीटीव्हीव्दारे लक्ष ठेवण्यात येते. मात्र रस्त्यांवरील गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेण्याबाबत निर्णय झाला. सीसीटीव्ही, एसआरपीएफ, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून लॉकडाऊनचे पालन अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे टोपे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा