दहावी- बारावीच्या निकालासाठी पहावी लागणार लॉकडाऊन संपण्याची वाट

0
173
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दहावी- बारावीचे निकाल वेळेवर लावण्याचे मोठे आव्हान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि राज्याच्या शिक्षण विभागापुढे उभे ठाकले आहे. शंभर टक्के पेपर तपासणी झाल्याशिवाय दहावी- बारावीच्या परीक्षेचे निकालच लावता येत नसल्यामुळे आणि राज्यातील कंटेनमेंट झोनमध्ये पेपर तपासणीत मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असल्यामुळे या दोन्ही परीक्षांचे निकाल लागण्यासाठी लॉकडाऊन संपण्याची वाट पहावी लागण्याची शक्यता आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनीच तसे संकते दिले आहेत.

दहावी आणि बारावीचे राज्यातील सर्व विभागीय शिक्षण मंडळांचे निकाल एकाच वेळी जाहीर करणे बंधनकारक आहे. तसेच पेपर तपासणीचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय निकालाची अंतिम तारीखही जाहीर करता येत नाही. कंटेनमेंट झोनमधील पेपर तपासणी वेळेत पूर्ण झाली तरच दहावी- बारावीचे निकाल वेळेत लावता येऊ शकतील, अन्यथा लॉकडाऊन संपेपर्यंत आपल्याला थांबावे लागेल, असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊनच्या काळातही दहावी आणि बारावीच्या परीक्षेची पेपर तपासणी शक्य तितक्या लवकर व्हावी, यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. पेपर तपासणीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक व संबंधित अधिकाऱ्यांना परवानगीच्या पासेस देण्यात याव्यात यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शिक्षण विभागाने पत्रही लिहिले आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये या कामासाठी सहज परवानगीही मिळत आहे. मात्र रेड झोनमध्ये परवानगी मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यातच रेड झोनमधील कंटेनमेंट क्षेत्रात तर आणखी अडचणी येत आहेत.

कोरोनाच्या कंटेनमेंट क्षेत्रात सार्वजनिक वाहतूक आणि प्रवाससाठीच्या पासेस मिळवण्यात पेपर तपासणीस शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि शिक्षण विभागाच्या अपेक्षेप्रमाणे पेपर तपासणीचे काम पुढे सरकताना दिसत नाही. त्यामुळे कंटेनमेंट झोनमधील पेपर तपासणीचे काम पूर्ण होईपर्यंत दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल लागणे अवघड आहे. त्यातच आता १८ मेपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याचे स्वरूप कसे असेल, यावरही हे काम किती वेगाने पुढे जाईल, हे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा