औरंगाबादेतील संचारबंदी कडक करा, मृत्यूचे प्रमाण वाढण्यामागची कारणे शोधाः आरोग्यमंत्री राजेश टोपे

0
164

औरंगाबाद : मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात  कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने त्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढील नियोजन अत्यंत बारकाईने करा. शहरातील मृत्युदर पाहता प्रत्येक रुग्णांचा अभ्यास करणे आवश्यक असून तो आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने खबरदारी घ्यावी. शहरातील प्रादुर्भावाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि नवीन रूग्णांची भर पडू नये म्हणून सध्या सुरू असलेली संचारबंदी अधिक कडक करा, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

आरोग्य मंत्री टोपे यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. सर्व यंत्रणांच्या साहाय्याने ह्या परिस्थितीचा सामना करणे गरजेचे आहे. औरंगाबाद शहरात सध्या असलेल्या कंटेटमेंट झोन परिसरातील आरोग्य विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना पीपीई किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येतील. याकामी आवश्यक तेवढा निधीही उपलब्ध करुन देऊ, असे टोपे म्हणाले. 

हेही वाचाः औरंगाबादः कोरोना संसर्गाचा आता ग्रामीण भागात शिरकाव, दौलताबादेत आढळला पॉझिटिव्ह रूग्ण

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचीही मदत घ्यावी. यंत्रणेसाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री शासनस्तरावरून लवकरच देण्यात येईल. त्याचबरोबर सीएसआर निधीतूनही मोठ्याप्रमाणात मदत करण्यात येईल. महापालिकेने क्वारंटाईन ठिकाणी अधिकाधिक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्या. शहरात कोविड रुग्णांव्यतिरिक्त इतर रुग्णांसाठी आरोग्य सेवा सुरू असाव्यात. विशेष करुन ग्रामीण भागातील दवाखाने सुरू राहतील यावर लक्ष ठेवा. खासगी डॉक्टरांनीही यासाठी पुढाकार घ्यावा असेही टोपे म्हणाले.

या बैठकीला विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस उपायुक्त चिरंजीव प्रसाद, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, उपायुक्त श्रीमती वर्षा ठाकुर, पराग सोमण, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. कुलकर्णी, घाटीतील मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा