औरंगाबादेत कोरोनाचा तिसरा बळी, बिसमिल्ला कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू

0
70

औरंगाबाद : औरंगाबादेत आज कोरोनाने तिसरा बळी घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच घाटीमध्ये उपचार सुरू असलेल्या ६५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा शनिवारी सकाळी ६.४५ च्या सुमारास मृत्यू झाला. अशी माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. दरम्यान, बायजीपुऱ्यातील आणखी एक १५ वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असून त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९ वर गेली आहे.

बिस्मिल्ला कॉलनी येथील ६५ वर्षीय या वृद्धेवर अगोदर जसवंतपुरा-किराडपुरा मार्गावरील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथून त्यांनी आणखी एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर त्यांना घाटीत दाखल करण्यात आले होते. त्यामुळे या महिलेवर उपचार करण्यात आलेले खासगी रुग्णालयही सील करण्यात आले होते.

घाटीत दाखल केल्यानंतर या महिलेचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. १६ एप्रिल रोजी या महिलेचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला होता. या महिलेवर विशेष कोरोना वॉर्डात उपचार सुरू होते. या महिलेला मधुमेह, रक्तदाब आणि किडनीचेही आजार होते, असे डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले. आज सकाळी या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची शहरातील संख्या ३ झाली आहे.

बायजीपुयातील १५ वर्षीय मुलालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याची माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९ झाली आहे. मंगळवारी सायंकाळी बायजीपुयातील १७ वर्षीय मुलाला लागण झाल्याचे समोर आले होते. तो १० एप्रिलला गरोदर आईला घेऊन खाजगी रुग्णवाहिकेने मुंबईहून औरंगाबादला आला होता. त्यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यात आईचा आणि मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला. आता त्याच कुटुंबात १५ वर्षीय मुलाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा