यवतमाळमधील तीनही कोरोनाग्रस्तांचा अहवाल निगेटिव्ह, जिल्ह्यातील बाधितांची संख्या शून्यावर!

0
52

यवतमाळः येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तीनही कोरोनाबाधितांच्या स्वॅब तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले असून या तिघांनाही घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आल्यामुळे सध्या तरी यवतमाळ जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे चित्र आहे.

जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांनी सांगितले की, दुबईहून यवतमाळमध्ये परतलेल्या ९ जणांपैकी तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील विलिगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यासोबतच्या अन्य सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले होते. या तीन बाधितांना गेले काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराअंती या तिन्ही रूग्णांचे दोन स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. हे दोन्ही तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी त्यांचा शेवटचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

घरी सोडण्यात आलेल्या या तिघांनाही पुढील १४ दिवस होम क्वारंटाइन ठेवण्यात येणार असून त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची नजर असणार आहे. या तीन रूग्णांना घरी सोडण्यात आल्यामुळे सध्या तरी यवतमाळ जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रूग्ण नाही. त्यामुळे तूर्तास हा जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे मानण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा