राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ५२, मुंबईतील दोघांची प्रकृती गंभीरः आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती

0
284
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : राज्यात कोरोनाचे आज दिवसभरात एकूण ४ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५२ झाली आहे. या ४ रुग्णांपैकी मुंबई येथील २ तर पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे प्रत्येकी एक रुग्ण आहे. सध्या रुग्णालयात भरती असलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी ४१ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत तर ८ जणांना सौम्य लक्षणे आहेत. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

दरम्यान, राज्यातील काही कोरोनाबाधीत रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत असून अशा रुग्णांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा चाचणी केली जाईल. त्यात त्यांचे नमुने निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे टोपे म्हणाले. मुंबई येथे आज आढळून आलेल्या दोन रुग्णांमध्ये एका ३८ वर्षीय तरुणाने तुर्कस्थान येथे प्रवास केला असून ६२ वर्षीय व्यक्तीने (पुरुष) इंग्लंड येथे प्रवास केलेला आहे. तर पुण्यातील २० वर्षीय तरुणाने स्कॉटलंड येथून प्रवास केलेला आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील फिलीपाईन्स आणि सिंगापूर येथे जाऊन आलेला जो २२ वर्षीय तरुण दोन दिवसांपूर्वी कोरोना बाधित आढळला. त्याचा २४ वर्षाचा भाऊ आज कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोना बाधितांचा तपशील असाः पिंपरी चिंचवड मनपाः १२, पुणे मनपाः ९, मुंबईः ११, नागपूरः ४, यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण प्रत्येकीः ३, अहमदनगरः २, रायगड, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी प्रत्येकीः १

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा