महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पोहोचला २,३३४ वर, ११ जणांचा मृत्यू

0
67
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्रात आज नवीन ३५२ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या २३३४ वर पोहोचली आहे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. नवीन आढळलेल्या रुग्णांपैकी २४२ रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत.

दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईतील ९ पुण्यातील एक तर मीरा भाईंदरमधील एका रुग्णांचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ४ पुरुष तर ७ महिला आहेत. ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांपैकी ८ रुग्णांमध्ये ( ७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १६० झाली आहे.

दरम्यान, आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांपैकी २२९ रुणांना उपचारानंतर बरे होऊन दवाखान्यातून घरी सोडण्यात आले आहे. आज मालेगावमध्ये १४ तर नागपूर महानगरपालिका हद्दीत११ आणि ठाणे महापालिका हद्दीत ९ नवीन रूग्ण आढळून आले. पुण्यात गेल्या २४ तासांत ३९ नवे रूग्ण आढळून आले आहेत तर मुंबईत २४२ नवे रूग्ण आज विविध रुग्णालयांत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवणारी आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा