मराठवाड्यात कोरोनाचे २७ रूग्ण; नांदेड, बीड,परभणी जिल्हे कोरोनामुक्त!

0
92

औरंगाबाद : मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत आतापर्यंत २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून सर्वाधिक रूग्ण१४ रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्याखालोखाल ८ रूग्ण लातूरमध्ये आढळून आले आहेत. विशेष म्हणजे नांदेड, बीड आणि परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये अद्याप एकही कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आलेला नसल्यामुळे सध्या तरी हे तीन जिल्हे कोरोनामुक्त आहेत.

मराठवाड्यात आढळून आलेल्या २७ रूग्णांपैकी औरंगाबादेत एका रुग्णावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले आहे तर एका ५८ वर्षीय रूग्णाचा मृत्यू झाला आहे. उर्वरित २५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मराठवाड्यात सर्वाधिक १४ रूग्ण औरंगाबादमध्ये आहेत. औरंगाबाद पाठोपाठ लातुरात ८ , उस्मानाबादेत ३ आणि जालना, हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक रूग्ण आहे.

मराठवाड्यात आतापर्यंत १३७१ जणांचे घशातील द्राव (स्वॅब) तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यापैकी १०४५ जणांचे तपासणी अहवाल आले असून २९९ अहवालांची प्रतीक्षा आहे. मिळालेल्या तपासणी अहवालांपैकी १०२१ नमुने निगेटिव्ह आले आहेत तर २७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  २४ अहवाल मानकाप्रमाणे नसल्यामुळे ते पुनर्तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मराठवाड्यातील २३९७ व्यक्तींना होम क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. तर २४७ व्यक्ती हॉस्पिटल क्वारंटाइन आहेत. त्यापैकी ५८७ व्यक्ती अलगीकरण कक्षात (आयसोलेशन वार्ड) आहेत.

मराठवाड्यात सहा तपासणी प्रयोगशाळाः मराठवाड्यात कोरोना चाचणीसाठी सहा तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात प्रयोगशाळा सुरू झालेली आहे. लातूर येथील प्रयोगशाळेस आयसीएमआरची मान्यता मिळालेली आहे. उर्वरित चार प्रयोगशाळा मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत.

मराठवाड्यातील २८१ जण निझामुद्दीनहून परतलेः  दिल्लीच्या बहुचर्चित निझामुद्दीन मरकजमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गेलेल्या २८१ व्यक्ती मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत परतल्या आहेत. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ११०, जालना जिल्ह्यातील १२, परभणीतील २१, हिंगोलीतील १७, नांदेड जिल्ह्यातील ३३, लातूरमधील ३१, उस्मानाबादमधील २८ आणि बीड जिल्ह्यातील २९ व्यक्तींचा समावेश आहे. यापैकी २७८ व्यक्तींचा शोध घेण्यात आलेला आहे. यापैकी ६७ व्यक्ती देशातील अन्य राज्यांतील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा