औरंगाबादेत कोरोनाग्रस्तांची संख्या ५१ वर, आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

0
198
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबादेतील कोरोनाग्रस्तांची संख्या आज ५१ वर गेली. चिकलठाण्यातील विशेष कोरोना रूग्णालय म्हणजेच जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या आसेफिया कॉलनीतील ३५ वर्षीय आणि समता नगरातील ६५ वर्षीय महिलेचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

जिल्हा सामान्य रूग्णालयात सध्या २० तर घाटी रुग्णालयात ४ अशा २४ कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आजवर आढळून आलेल्या ५१ रुग्णांपैकी २२ रुग्ण उपचारानंतर घरी गेले आहेत तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादेत कोरोना बाधितांचा मृत्यूदर ९.८० टक्के आहे तर बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय म्हणजे ४३.१३ टक्के आहे. औरंगाबादेत १५ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर १५ मार्च ते १ एप्रिल या काळात शहरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला नव्हता.

पंधरा दिवसांच्या कालखंडानंतर म्हणजेच २ एप्रिलपासून शहरात कोरोनाच्या संसर्गाने उचल खाल्ली आणि तेव्हापासून कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दुसरीकडे शहरात कोरोनाचा संसर्ग पसरू नये उपाययोजना केल्या जात असतानाच औरंगाबादकरांनी मात्र हा संसर्ग पसरू नये फारशी खबरदारी घेतलेली दिसत नाही. आजही कारण नसताना रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या बरीच आहे. सोशल डिस्टन्सिंग हा कोरोनाचा फैलाव रोखण्याचा एकमेव उपाय असून त्याचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा