औरंगाबादेत आज वाढले २६ कोरोना बाधित रूग्ण, एकूण रूग्णसंख्या ६५३

0
120

औरंगाबादः औरंगाबाद शहरात २६ कोविडबाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बधितांची संख्या ६५३ झाली आहे. नव्याने भर पडलेल्या रूग्णांत १५ पुरूष आणि ११ महिला रुग्णांचा समावेश आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधित असलेल्या औरंगाबाद शहरातील समता नगरमधील १, किल्लेअर्कमधील २ आणि आसेफिया कॉलनीतील १ असे ४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ११७ जण कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले.

आज नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांत पुंडलिक नगरमधील २, सिडको एन-७ मधील ४, संजयनगरमधील ५ आणि सिडको एन-८, प्रकाशनगर, चिकलठाणा, भडकल गेट, दत्तनगर, शहानूरमियाँ दर्गा, गांधीनगर, रोशन गेट, बायजीपुरा, भीमनगर- भावसिंगपुरा या भागातील प्रत्येकी एक रूग्णाचा समावेश आहे. तर इतर भागातील ४ रूग्णांचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात आज २१ जणांच्या लाळेचे नमुने घेऊन घाटीत तपासणीसाठी पाठवले आहेत. सध्या जिल्हा सामान्य रूग्णालयात ९५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत, असेही रूग्णालय प्रशासनाने सांगितले.

घाटीत ५३ कोविडबाधितांवर उपचार सुरूः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे आज दुपारी चार वाजेपर्यंत डेडिकेटेड कोविड रुग्णालयात ५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी ४९ रुग्णांची स्थिती सामान्य आहे. चार रुग्णांची स्थिती गंभीर आहे. तसेच ४३ कोरोना निगेटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. घाटीमध्ये एकूण ७२ रुग्णांची स्क्रिनिंग करण्यात आली. त्यापैकी २७ रुग्णांचा स्वॅब घेण्यात आला असून दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ११ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. १४ रुग्णांचा अहवाल येणे बाकी आहे. घाटीत एकूण ११० रुग्ण भरती आहेत.

घाटीत आज सहा नवे कोरोना पॉझिटिव्हः मकसूद कॉलनी, रोशन गेट येथील ३७ वर्षीय स्त्री यांना खासगी रुग्णालयातून घाटी येथे काल संध्याकाळी संदर्भीत करण्यात आलेले आहे. शहानूर मियाँ दर्गा  येथील ५७ वर्षीय पुरुष, गांधीनगर येथील ५९ वर्षीय पुरुष, रोशन गेट येथील ४२ वर्षीय पुरुष, तसेच जुना मोंढा, भवानी नगर येथील २७ वर्षीय गरोदर महिला, बायजीपुरा येथील ४० वर्षीय महिला, भीमनगर-भावसिंगपुरा येथील ७४ वर्षीय महिला यांचा  कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आलेला आहे, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आणि माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळवले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा