देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६०६ वर, सर्वाधिक १२८ कोरोनाग्रस्त रूग्ण महाराष्ट्रात

0
221

नवी दिल्लीः बुधवारी एकाच दिवशी देशभरात ९० कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असून देशातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ६०६ वर पोहोचली आहे. तर देशात आजवर कोरोनाने १० जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या १२८ वर पोहोचली आहे.

सध्या देशात सक्रीय कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ५५३ आहे. ४३ कोरोनाग्रस्त बरे झाले, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला किंवा त्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. ६०६ कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये ४३ परदेशी नागरिकांचाही समावेश असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मंगळवारी देशातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ५१९ होती. महाराष्ट्रात आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या १० वर पोहोचली आहे.

 देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या महाराष्ट्रात असून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या १२८ वर पोहोचली आहे. त्यात तीन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. महाराष्ट्राखालोखाल सर्वाधिक १०९ कोरोनाग्रस्त केरळमध्ये आहेत. त्यात ८ परदेशी नागरिकांचा समावेश आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

 देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. देशातील १३० कोटी जनतेने सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही तर भारत कोरोनाविरुद्धचे युद्ध हारेल आणि देश २१ वर्षे मागे जाईल, असे मोदी यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा