औरंगाबादेत दोन कोरोना पॉझिटिव्ह, एन-४,आरेफ कॉलनी सील; पुंडलिकनगरात गल्लीबंदी

0
206
पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि पथकाने सिडको एन-४ परिसर सील केला.

औरंगाबादः औरंगाबादेत गुरूवारी दोन जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघांचेही नमुने तीव्र कोरोना संशयित असल्यामुळे त्यांचा स्वॅब पुण्यातील एनआयव्हीकडे पाठवण्यात आला होता. एनआयव्हीच्या तपासणीतही या दोघांना कोरोनाची बाधा झाल्याची पुष्ठी मिळाली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने आरेफ कॉलनी सील केली आहे. तर  दोघांपैकी एक कोरोना बाधित सिडको एन-४ परिसरातील असल्यामुळे या परिसरालगतच असलेल्या पुंडलिकनगरमध्ये तरूणांनी नाकाबंदी करत सर्व गल्ल्या स्वतःहोऊन बंद करून टाकल्या आहेत.

तीन आठवड्यांपूर्वी औरंगाबादेत एक कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला होता. मात्र उपचाराअंती तो पूर्णपणे बरा झाला होता.  त्यानंतरच्या काळात औरंगाबादेत एकही कोरोनाबाधित न आढळल्यामुळे बेफिकिरीने वागणाऱ्या औरंगाबादकरांची गुरूवारी दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे झोप उडाली आहे. हे दोघेही चिकलठाण्यातील जिल्हा सामान्य रूग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत. दोन कोरोनाबाधितांपैकी एक रुग्ण असलेला १२ वर्षीय तरूण आरेफ कॉलनीतील रहिवासी आहे तर दुसरा कोरोनाबाधित रूग्ण सिडको एन-४ मध्ये राहणारी ५५ वर्षीय महिला आहे.

मंगळवारी शहरातील १३८ जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ९ जण संशयित आढळल्यामुळे त्यांच्या घशाचा द्राव( स्वॅब) तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी ७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या दोघांवरही जिल्हा सामान्य रूग्णालयात एआरटी उपचार सुरू आहेत. या दोन रूग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही तपासणी केली जाणार आहे. आरेफ कॉलनीतील रुग्णांच्या कुटुंबातील ५ जणांना तातडीने हॉस्पीटल क्वारंटाइन करण्यात आले आहे.

सिडको एन-४ मधील कोरोनाबाधित महिला तिच्या पतीसोबत दिल्ली, आग्रा फिरून शहरात परतले होते. या महिलेला सर्दी, ताप, खोलका आदी लक्षणे आढळून आल्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. पती-पत्नी दोघांचेही स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. पतीचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. आरेफ कॉलनीतील तरूण पुण्यातील आयटी कंपनीत नोकरीला आहे. पुण्यात लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर दहा दिवसांपूर्वी तो औरंगाबादेत परतला होता. दहा दिवसांपासून त्याला कोणतेही लक्षणे नव्हती. मात्र सोमवारी त्याला सर्दी, खोकला आणि घशात खवखव असा त्रास सुरू झाला. जिल्हा सामान्य रूग्णालयात त्याची स्क्रिनिंग केल्यानंतर त्याला संशयित म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

आरेफ कॉलनी, सिडको एन४ सीलः एकाच दिवशी औरंगाबादेत  दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून आरेफ कॉलनी आणि सिडको एन४ परिसर सील करण्यात आला आहे. या दोन्ही रूग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.

पुंडलिकनगरात गल्लीबंदीः सिडको एन-४ मध्ये कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याचे कळताच या भागाच्या शेजारीच असलेल्या पुंडलिकनगरमध्ये खळबळ उडाली असून येथील तरूणांनी मिळेल ते साहित्य वापरून रात्रीच सर्व गल्ल्यांमध्ये जाणारे रस्ते बंद करून टाकले आणि नाकाबंदी केली. प्रत्येक गल्लीच्या प्रवेश रस्त्यावर बसून ५१ ते २० तरूण पहारा देत असल्याचेही पहायला मिळाले. कोणालाही आत येण्यास आणि आतील व्यक्तीला बाहेर जाण्यास या तरूणांनी मज्जाव केला आहे. शहरात दोन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्यामुळे प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा