हर्सूल तुरूंगातील दोन कोरोना बाधित कैदी कोविड सेंटरमधून पळाले

0
112
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबादच्या किलेअर्क परिसरातील कला महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेले हर्सूल तुरूंगातील दोन कोरोना बाधित कैदी पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्सूल तुरूंगातील २९ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्यावर किलेअर्क परिसरातील कला महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. रविवारी रात्री पावणे आकराच्या सुमारास बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी लघुशंकेसाठी गेल्याची संधी साधून या कोविड सेंटरच्या पहिल्या मजल्यावरील दोन आरोपींनी खिडकीचे गज वाकवले आणि बेडशीटची दोरी बनवून तिच्या साह्याने खाली उतरून पळ काढला. तेथे तैनात असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही बाब लक्षात आणून देताच तूरुंग अधिकारी कैलास काळे यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह मोटारसाकलवर या कैद्यांचा पाठलाग केला. दिल्लीगेट येथे हे दोन्ही कैदी अंधारात लपून बसल्याचे काळे यांना दिसले. त्यांनी या दोन्ही कैद्यांना थांबा असे म्हटल्यावर ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. त्यानंतर आजूबाजूला शोध घेतल्यानंतर ते आढळून आले नाही, असे काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पळून गेलेल्या दोन कैद्यांपैकी एक कैदी आक्रम खान गयास खान हा औरंगाबादच्या जटवाडा येथील असून त्याच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात ३०२, १२० (ब) चा गुन्हा दाखल आहे. दुसरा कैदी सय्यद सैफ सय्यद असद यांच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात ४९८ ( अ) (ब)(क), ४२० चा गुन्हा दाखल आहे. तो औरंगाबादच्याच यासीम मशिदीजवळील नेहरू नगरचा रहिवासी आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा