विद्यापीठांच्या जुलैमध्ये परीक्षा, नव्या सत्रात शनिवारची सुटी रद्दः यूजीसीचे वेळापत्रक जाहीर

0
4757
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोनाच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या देशातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या आणि अंतिम सत्राच्या परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहेत. पहिले आणि शेवटचे सेमिस्टर वगळता अन्य सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना विद्यमान आणि मागील सेमिस्टरच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे ग्रेड देण्यात यावेत, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आज देशातील सर्व विद्यापीठांना दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षांबाबत निर्माण झालेला गोंधळ आता संपुष्टात आला आहे.

कोरोनाच्या ससंर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा कधी होणार आणि नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार याबाबत विद्यार्थी साशंक होते. यूजीसीने आज अकॅडमिक कॅलेंडरबरोबरच परीक्षांबाबतही मार्गदर्शक सूचनाही बुधवारी जारी केल्या आहेत. जुन्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र ऑगस्टपासून तर नवीन विद्यार्थ्यांसाठीचे शैक्षणिक सत्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्ष/ सेमिस्टरच्या परीक्षा १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत घ्याव्यात आणि ३१ जुलैपर्यंत परीक्षेचे निकाल जाहीर करावेत, असे यूजीसीने म्हटले आहे.

हेही वाचाः लॉकडाऊनमुळे अडकलेले पर्यटक, मजूर, विद्यार्थ्यांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा

तीनऐवजी दोन तासांची परीक्षाः प्रलंबित परीक्षांचीबाबत विद्यापीठे कमीत कमी कालावधीत प्रक्रिया पूर्ण होईल अशा पर्यायी पद्धतीचा अवलंब करू शकतात. ३ तासांच्या परीक्षेचा कालावधी २ तासांवर आणण्यासाठी विद्यापीठांनी प्रभावी आणि नाविण्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करावा, अशी सूचनाही यूजीसीने केली आहे. चालू शैक्षणिक सत्रासाठी ३१ मेपर्यंत ऑनलाइन क्लासेस घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे. विद्यापीठे त्यांचे नियम, परिनियम, परीक्षा पद्धतीप्रमाणे सत्र परीक्षा आणि वार्षिक परीक्षा ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने घेऊ शकतात. हे करत असताना सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याची दक्षता मात्र विद्यापीठांनी घ्यावी, असे यूजीसीने म्हटले आहे.

हेही वाचाः कोरोना महामारीच्या संकटाने केली मोदींच्या ‘गुजरात मॉडेल’ची पोलखोल!

नवे सत्र सप्टेंबरपासूनः  २०२०-२१ या शैक्षणिक सत्रासाठी यूजीसीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार नव्या सत्राची प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी. द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या तासिका १ ऑगस्टपासून तर प्रथम वर्ष किंवा प्रथम सेमिस्टरच्या तासिका १ सप्टेंबरपासून सुरू कराव्यात. प्रत्येक विद्यापीठाने कोरोना सेलची स्थापना करावी. त्याद्वारे अकॅडमिक कॅलेंडर आणि परीक्षेशी संबंधित विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करावे, असे यूजीसीने म्हटले आहे.

हेही वाचाः पालघर प्रकरणी आकांडतांडव करणारा भाजप बुलंदशहरातील साधूंच्या हत्येप्रकरणी चिडीचूप का?

सहा दिवसांचा आठवडा, शनिवारची सुटी रद्दः कोरोनाच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे झालेले २०१९-२० या राहिलेल्या शैक्षणिक सत्राचे आणि २०२०-२१ या नव्या शैक्षणिक सत्राचे नुकसान भरून काढण्यासाठी सर्व विद्यापीठांनी सहा दिवसांच्या आठवड्याचा पॅटर्न स्वीकारावा. सोशल डिस्टन्सिंगचे महत्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल लॅबरॉटरी आणि डिजिटल रिसोर्सेसच्या माध्यमातून लॅबरॉटरी असाइनमेंट्स, प्रॅक्टिकल असाइमेंट्स मिळतील, याकडे लक्ष द्यावे. प्रत्येक विदयापीठ/ संस्थांनी व्हर्च्युअल क्लासरूम, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा विकसित करावी आणि सर्व अध्यापकांना त्याचे प्रशिक्षण द्यावे, अशी सूचनाही यूजीसीने केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा