सोमवारपासून उघडणार शॉपिंग मॉल्स,हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि धार्मिक स्थळेः नियमावली जारी

0
926
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः कंटेनमेंट क्षेत्राबाहेरील शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि धार्मिक स्थळे ८ जूनपासून उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज त्याबाबतची नियमावली जारी केली.  त्यात अनेक नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. सर्व ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग अनिवार्य करण्यात आले आहे. कंटेनमेंट झोनमधील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि शॉपिंग मॉल्स उघडण्याची परवानगी मात्र देण्यात आलेली नाही.

सर्व ठिकाणांसाठी बंधनकारक नियमः दोन व्यक्तींमध्ये ६ फूटांचे अंतर राखावे. फेस कव्हर, मास्क किंवा रूमाल, टॉवेल अथवा अन्य कापडाने चेहरा झाकावा. ठराविक अंतराने अधून-मधून अनेक वेळा हात धुवावेत. साबणाने हात धुतल्यास किमान ४० ते ६० सेकंद आणि अल्कोहोलपासून निर्मिती केलेल्या सॅनिटायझरने २० सेकंदांपर्यंत हात धुवावे लागतील. खोकलताना किंवा शिंकताना चेहरा झाकावा. फक्त असिम्प्टोमॅटिक म्हणजेच ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत, अशाच लोकांना या सर्व ठिकाणी प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे.सर्वांना आरोग्य सेतु अॅप इन्स्टॉल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या सर्व ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

 धार्मिक स्थळेः धार्मिक स्थळी प्रवेशापूर्वी हातपाय धुवावे लागतील. धार्मिक स्थळी असलेले धार्मिक ग्रंथ आणि मूर्तींना स्पर्श करू नये. ६५ वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती आणि १० वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुले यांना धार्मिक स्थळी जाण्यास परवानगी असणार नाही. धार्मिक स्थळी प्रसाद वाटता येणार नाही, जल शिंपडता येणार नाही. धार्मिक स्थळांवर थर्मल स्क्रिनिंग करणे आणि मास्क घालणे अनिवार्य असेल. धार्मिक स्थळाला वारंवार सॅनिटाइज करणे बंधनकारक असेल. धार्मिक स्थळी प्रार्थना सभा घेता येणार नाहीत. भजन-किर्तनासारखे कार्यक्रम करता येणार नाहीत.

हॉटेल्स/ रेस्टॉरंट्सः हॉटेल्स- रेस्टॉरंट्समध्ये गर्भवती महिला, वयोवृद्ध व्यक्तींनी जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. रेस्टॉरंटमध्ये थोड्या थोड्या वेळाने हात धुण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हॉटेल-रेस्टॉरंटचा मेन्यू डिस्पोजेबल असावा. रेस्टॉरंटमध्ये बसताना दोन सीट्समध्ये पुरेसे अंतर राखावे. हॉटेल-रेस्टॉरंटमधून ग्राहक गेल्यानंतर ते बसलेली खुर्ची सॅनिटाइज करणे अनिवार्य असेल. हॉटेल-रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांना हँडग्लोव्हज आणि मास्क घालणे अनिवार्य आहे. कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात एकमेकांशी संपर्क टाळावा. थुंकण्यास सक्त मनाई असेल. बिले अदा करण्यासाठी रोख रकमेऐवजी डिजिटल किंवा ऑनलाइन पेमेंटचा पर्याय निवडावा.

शॉपिंग मॉल्सः प्रवेशद्वारावर सॅनिटाइज डिस्पेन्सर आणि थर्मल स्क्रिनिंग अनिवार्य. कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा संदेश देणारे पोस्टर्स, स्टॅण्डीज आणि दृकश्राव्य माध्यमे ठळकपणे दिसतील अशा ठिकाणी लावावे. फिजिकल डिस्टन्सिंग राखता यावे म्हणून पुरेसे अंतर राखून मार्किंग करावी. येण्यासाठी आणि जाण्यासाठी स्वतंत्र गेटची व्यवस्था करावी. एसीचे तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान ठेवावे. शॉपिंग मॉल्समधील दुकाने उघडतील मात्र गेमिंग आर्केड्स, चित्रपटगृहे आणि आमि मुलांची खेळण्याची ठिकाणे बंद राहतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा