एप्रिल-मे महिन्यात मिळणार कोरोनाची लस, दोन डोसची कमाल किंमत असेल एक हजार रुपये!

0
202
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः डिसेंबर- जानेवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी एक खुश खबर दिली आहे. एप्रिल-मे महिन्यात कोविशिल्ड ही कोरोनावरील लस भारतात उपलब्ध होईल आणि दोन आवश्यक डोसची जास्तीत जास्त किंमत एक हजार रुपये असेल, असे पूनावाला म्हणाले.

ब्रिटनमध्ये नियामक मंडळाकडून लसीला परवानगी मिळते, तशीच परवानगी आम्ही भारतातही घेणार आहोत. प्रारंभी आपत्कालीन परिस्थितीत या लसीचा वापर केला जाईल. सामान्य जनतेला ही लस मिळण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो. ज्येष्ठ नागरिकांवरील उचारासाठी ही लस फेब्रुवारी महिन्यात तर सर्वसामान्यांसाठी ही लस एप्रिल महिन्यापर्यंत उपलब्ध होऊ शकते. लसीच्या दोन आवश्यक डोससाठी जास्तीत जास्त १ रुपये किंमत असेल, असे पूनावाला यांनी हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट-२०२० मध्ये बोलताना सांगितले.

हेही वाचाः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना सज्जतेचे आदेश

सरकारकडून मोठ्या प्रमाणात या लसीची खरेदी केली जाईल. त्यामुळे ही लस कमी किंमतीत उपलब्ध होईल. आम्ही उत्पादन क्षमता वाढवत आहोत. लवकरच आम्ही दरमहिन्याला १० कोटी डोसचे उत्पादन करणार आहोत. जुलैपर्यंत भारतात कोविशिल्ड लसीचे ३० ते ४० कोटी डोस देऊ शकणार आहोत, असेही पूनावाला यांनी स्पष्ट केले.

 कोविशिल्ड लसीपासून आपण किती काळ सुरक्षित राहू शकतो हा मुख्य प्रश्न आहे. या लसीने ज्येष्ठ नागरिकांवरही उत्तम परिणाम दाखवले आहेत. या लसीमुळे आपण किती काळासाठी सुरक्षित राहू, याचे उत्तर काळच देईल. सध्या तरी याबाबत कोणतेही आश्वासन देता येणार नाही. त्याबाबत आपण केवळ दावा करू शकतो किंवा अंदाज बांधू शकतो. आतापर्यंत लसीचे परिणाम उत्तम आहेत, असेही पूनावाला म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा