व्हॉट्सअपवर आता एकावेळी एकाच व्यक्तीला फॉर्वर्ड करता येईल मेसेज

0
165

नवी दिल्लीः व्हॉट्सअपवर आलेला कोणत्याही फॉर्वर्ड मेसेज आता तुम्हाला फक्त एकाच व्यक्तीला पाठवता येणार आहे. कोरोना संसर्गाच्या नाजूक परिस्थितीत सोशल मिडीयाद्वारे पसरवण्यात येणाऱ्या अफवांना प्रतिबंध घालण्यासाठी व्हॉट्सअपने हे पाऊल उचलले आहे. या आधी व्हॉट्सअपवर आलेला कोणताही मेसेज एकावेळी पाच व्यक्तींना फॉर्वर्ड करता येत होता. त्यापूर्वी असंख्य लोकांना मेसेज फॉर्वर्ड करण्याची सुविधा होती. परंतु व्हॉट्सअपवर फेकन्यूज धडाधड फॉर्वर्ड केल्यामुळे व्हॉट्सअपने एक मेसेज एकावेळी फक्त पाचच जणांना फॉर्वर्ड करण्याची मर्यादा घालून दिली होती. त्यामुळे फेकन्यूजला बऱ्यापैकी आळा बसला होता.

व्हॉट्सअपवर आलेला एखादा मेसेज फेक किंवा बनावट आहे की नाही, याची यूजरला इंटरनेटच्या माध्यमातून खातरजमा करून घेता यावी, असे फिचर विकसित करण्याचाही व्हॉट्सअपचा प्रयत्न आहे. सध्या हे फिचर व्हॉट्सअपच्या बिटा व्हर्जनवर उपलब्ध आहे. लवकरच सर्व व्हॉट्सअप  यूजर्ससाठी ते उपलब्ध होईल.

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पसरवण्यात येत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर एक मेसेज एकावेळी एकाच व्यक्तीला फॉर्वर्ड करता येईल, अशी मर्यादा घालण्यात आल्याचे फेसबुकच्या मालकीचे असलेल्या व्हॉट्सअपने म्हटले आहे. व्हॉट्सअपने कोरोनाशी संबंधित माहितीसाठी इन्फर्मेशन हब सुरू केले आहे. त्याचबरोबर फॅक्ट चेकिंग सेवेसाठी १ लाख डॉलरची देणगीही दिली आहे.

व्हॉट्सअपने उचलेल्या या पावलामुळे बनावट, खोट्या बातम्या आणि अफवांना पायबंद बसेल, अशी अपेक्षा केली जाऊ लागली आहे. व्हॉट्सअप यूजरला त्याच्या कडे आलेला मेसेज फेकन्यूज आहे की खरा याची खातरजमा करून घेण्याची सोय उपलब्ध झाल्यास अफवांच्या बाजाराला चांगलाच लगाम बसणार आहे. आतापर्यंत कळत न कळत अनेक लोकांकडून असे मेसेज फॉर्वर्ड केले जात असल्यामुळे अफवांचा बाजार गरम होत आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा