मुंबईः वांद्रे पश्चिम स्टेशनबाहेरील ‘सोशल डिस्ऑर्डर’चा कोण आहे खरा मास्टर माइंड?

0
578

मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या परराज्यातील कामगारांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी ‘जनसाधारण रेल्वे’ सोडण्यात येणार असल्याचे पिल्लू सोडून देण्यात आल्यामुळे वांद्रे पश्चिम रेल्वे स्टेशनबाहेर शेकडो कामगारांनी प्रचंड गर्दी केली होती. कोरोनाच्या संकटामुळे पाळल्या जात असलेल्या ‘सोशल डिस्टन्सिंग’ काळात वांद्रे स्टेशनवर घडवून आणलेल्या या ‘सोशल डिस्ऑर्डर’चा खरा मास्टर माइंड कोण? असा महत्वाचा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मुंबईत कोरोना विषाणूच्या संसर्गाची स्थिती चिंताजनक असताना हे ‘सोशल डिस्ऑर्डर’ घडवून आणणाऱ्या या मास्टर माइंडने ‘मी पुन्हा येईन’ म्हणत डोकेवर काढू नये म्हणून त्याचा शोध घेऊन कायदेशीर पायबंद घालण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असल्याचे बोलले जात आहे.

 लॉकडाऊनमुळे हजारो मजूर, स्थलांतरित कामगार ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. या  स्थलांतरित मजूर व कामगारांसाठी रेल्वेकडून सर्वात मोठे रेस्क्यू ऑपरेशन चालवले जाणार असल्याची बातमी एका आघाडीच्या मराठी वृत्तवाहिनीने ‘लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांसाठी विशेष जनसाधारण ट्रेन सुरू होणार’ या शिर्षकाखाली दिली. त्या दाव्याच्या पुष्ठ्यर्थ दक्षिण मध्य रेल्वेच्या अंतर्गत पत्रव्यवहाराचा भाग असलेल्या १३ एप्रिल २०२० रोजीच्या पत्राचा आधार घेण्यात आला. ही बातमी मुंबईत वाऱ्यासारखी पसरली आणि पाहता पाहता मुंबईतील वांद्रे  पश्चिम रेल्वे स्टेशनबाहेर हजारोंच्या संख्येने स्थलांतरित कामगार, मजूर जमा झाले. या कामगार/ मजुरांची गर्दी होते न होते तोच एका प्रमुख राजकीय पक्षाचे नेतेही तेथे आपला लवाजमा घेऊन पोहोचले. त्यामुळे ज्या पत्राच्या आधारे त्या वृत्तवाहिनीने जनसाधारण विशेष रेल्वे सुरू होणार असल्याचे वृत्त दिले, ते पत्र त्या वृत्तवाहिनीने स्वतः मिळवले की ते त्यांच्यापर्यंत कुणी पद्धतशीरपणे पोहोचवण्याची व्यवस्था केली, याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

या शोधाच्या मूळाशी जाण्यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेवर सदस्य असलेल्या राजकीय पुढाऱ्यांपर्यंत पोहोचल्याशिवाय पोलिसांना खऱ्या मास्टर माइंडचा पर्दाफाश करता येणार नाही, असे जाणकारांना वाटते. विशेष म्हणजे वांद्रे पश्चिमचे भाजप आमदार आशिष शेलार यांच्या मतदारसंघातच हा ‘सोशल डिस्ऑर्डर’ घडलेला असताना त्यांनी ट्विट करताना मात्र वांद्रे पूर्व असे लिहिल्यानेही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी रेल्वे सोडण्यात येणार असल्याची अफवा कुणी पसरवली याची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. ही अफवा परसवणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे. सकृतदर्शनी ही अफवा पसरण्यामागे मराठी वृत्तवाहिनी दिसत असली तरी त्या मागच्या मास्टर माइंडपर्यंत गृहमंत्र्यांनी आदेशित केलेली ही चौकशी पोहोचणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा