१४ एप्रिलला लॉकडाऊन संपणार की आणखी वाढणार ? सरकार गप्प, संभ्रम कायम!

0
267

नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनची मुदत १४ एप्रिल रोजी संपणार का? सरकार लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवणार का? या महत्वाच्या प्रश्नावर सरकार गप्प आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील संभ्रम वाढत चालला आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीनंतरही या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर दिले नाही. ‘आम्ही जागतिक परिस्थितीवर प्रत्येक मिनिटाला लक्ष ठेवून आहोत. याबाबतचा कोणताही निर्णय राष्ट्रहित डोळ्यासमोरच ठेवून घेतला जाईल. सरकार योग्यवेळी योग्य निर्णय घेईल,’ एवढेच जावडेकर म्हणाले. पण ही ‘योग्यवेळ’ कधी येणार हे त्यांनी सांगितले नाही. अधिकाऱ्यांचा एक गट परिस्थितीचे अवलोकन करत आहे, असेही जावडेकर म्हणाले.

तिकडे उत्तर प्रदेशातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन हटणार नसल्याचे संकेत दिले आहेत. ‘ जोपर्यंत राज्य पूर्णतः कोरोनामुक्त होईल, तेव्हाच आम्ही लॉकडाऊन हटवू. एकाही व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग असला तरी लॉकडाऊन हटवणे अवघड होईल. त्या कारणामुळेच लॉकडाऊन हटवण्यासाठी वेळ लागेल,’ असे उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही १५ एप्रिलनंतर १०० टक्के लॉकडाऊन शिथिल होईल, असे कुणीही समजू नये. अनेक देशांतील परिस्थितीचा अभ्यास करून लॉकडाऊन कसे शिथिल करता येईल, याचा अभ्यास सुरू आहे.लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील, असे म्हटले आहे.

शहरी व ग्रामीण भागासाठी वेगळे धोरणः ‘लॉकडाऊन अनिश्चित काळासाठी कायम ठेवला जाऊ शकत नाही. परंतु तो सर्व ठिकाणांहून एकाचवेळी हटवलाही जाऊ शकत नाही,’ असा सूर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वच मंत्र्यांनी आळवला. याचाच अर्थ हॉटस्पॉट निश्चित करून शहरी आणि ग्रामीण भारतासाठी वेगवेगळे धोरण अमंलात आणून मर्यादित लॉकडाऊनचे धोरण पुढे रेटले जाईल आणि रस्ते व रेल्वे सारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या सेवा हळूहळू सुरू केल्या जातील, असे संकेत यातून मिळत आहेत.

कडक निर्बंधात मर्यादित शिथिलताः एकीकडे कोरोनाशी संबंधित तपासणी, विलगीकरण, सोशल डिस्टन्सिंग, क्वारंटाइन, कडक पोलिस बंदोबस्त आणि गरजूंना मदत पोहोचवण्याचे काम सुरू राहील तर दुसरीकडे सर्वसामान्य जनजीवन रूळावर आणताना मर्यादित आर्थिक आणि शैक्षणिक व्यवहार सुरू केले जातील, असेही संकेत मिळू लागले आहेत.

महाराष्ट्रातून निर्धारित तारखेला लॉकडाऊन हटवायचा की नाही, हे जनतेचा व्यवहार आणि सरकारी निर्देशांच्या पालनावर अवलंबून असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना आधीच स्पष्ट केले आहे.

टप्प्याटप्प्याची रणनीतीः ‘आम्हाला लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी आम्ही सामाइक धोरण अवलंबवावे लागेल. लॉकडाऊन हटवल्यानंतर लोक टप्प्या टप्प्याने बाहेर पडतील, याचीही खबरदारी घ्यावी लागेल,’ असे मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने संपुष्टात आणला जाईल, असे संकेत मोदींनी दिले होते.

सरकारला आर्थिक नुकसान आणि जनतेला येणाऱ्या अडचणी या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार असल्यामुळे सरकारने लॉकडाऊन कायम जरी ठेवला तरी त्यात काही बदल केले जातील, असे अनेक जाणकारांना वाटते.

एकदम हटवणे धोकादायकः मात्र देशातील नागरिकांच्या उत्सवी मानसिकतेकडे दुर्लक्ष करून नियोजनबद्ध तयारी पूर्ण न करता लॉकडाऊन हटवल्यास सामुदायिक संसर्ग अनेक पटींनी झपाट्याने वाढेल आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल, असा इशारा देशातील काही समाजशास्त्रज्ञांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा