‘कलंकित’ डॉ. धारूरकरांना त्रिपुरा विद्यापीठाने अपमानास्पदरित्या हाकलले, विमानतळापर्यंत जायला कारही दिली नाही!

1
3923

आगरतळाः 60 लाख रुपयांच्या प्रिंटिंग वर्कऑर्डरसाठी लाच घेताना स्टिंग ऑपरेशनमध्ये रंगेहात पकडलेले, आरएसएसचे तृतीय वर्ष शिक्षित आणि दोन वर्षे पूर्णवेळ प्रचारक राहिलेले त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे ‘कलंकित’ माजी कुलगुरू डॉ. वि.ल. धारूरकर यांना विद्यापीठ प्रशासनाने रविवारी अक्षरशः अत्यंत अपमानास्पदरित्या हाकलून दिले.त्यांना कोलकाता विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी साधी कारही देण्यास स्पष्ट नकार दिला. ते कोलकाता मार्गे महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.

डॉ. धारूरकर यांनी रविवारी दुपारी त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाच्या कॅम्पसमधील त्यांचे कार्यालयीन निवास्थान सोडले. तेथून ते खासगी कारने कोलकात्याला रवाना झाले. भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे प्रतिमा मलीन झालेल्या विद्यापीठ प्रशासनाने डॉ. धारूरकरांना विद्यापीठ कॅम्पसपासून विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यापीठाचे वाहन देण्यासही नकार दिल्यामुळे त्यांना नाईलाजाने खाजगी स्वतःचे वाहन पैसे देऊन भाड्याने घ्यावे लागले. व्हॅनगार्ड न्यूज या स्थानिक वृत्तवाहिनीने ऑपरेशन व्हाइट कॉलर या स्टिंग ऑपरेशनमध्ये नोटांचे बंडल स्वीकारताना आणि 60 लाखांच्या प्रिंटिंग वर्क ऑर्डरसाठी 10 टक्के लाच मागताना रंगेहात पकडले होते. त्यामुळे केंद्रीय मनुष्य विकास मंत्रालयाने तत्काळ राजीनामा द्या अन्यथा सीबीआय चौकशीला सामोरे जा, असा सज्जड दम दिल्यानंतर डॉ. धारूरकरांना शनिवारी राजीनामा देणे भाग पडले होते.

भ्रष्टाचारी कारनाम्यांचे पितळ उघडे पडूनही डॉ. धारूरकरांना कुलगुरूपद सोडवले जात नव्हते. परंतु राजीनामा द्या, अन्यथा सीबीआय चौकशीला सामोरे जा, असा सज्जड दम एचआरडी मंत्रालयाने देताच धारूरकरांनी कुलगुरूपद सोडले, असे सूत्रांनी सांगितले.

विद्यापीठाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. धारूरकरांनी प्रचंड प्रमाणात लाचखोरी करून विद्यापीठात 15 जणांची गेस्ट लेक्चरर म्हणून नियुक्ती केली. त्यात महाराष्ट्रातील दोन जणांचा समावेश आहे. या 15 जणांना विद्यापीठाच्या औपचारिक भरतीत नियमित करण्याचे आश्वासन देऊन डॉ. धारूरकरांनी त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. डॉ. धारूरकरांनी विद्यापीठ परिसरात 23 लाख रुपयांचा खर्च दाखवून गार्डन तयार केले. प्रत्यक्षात गार्डनवर 5 लाख रुपयेच खर्च झाले, उर्वरित रक्कम त्यांनी खिशात घातली, असाही त्यांच्यावर आरोप आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपले नातेवाईक आणि बगलबच्च्यांच्या नियुक्त्यांसाठी ज्यांनी डॉ. धारूरकरांना लाखो रुपयांची लाच दिली, अशा प्राध्यापकांचा एक गट रविवारी सकाळी विद्यापीठ कॅम्पसमधील डॉ. धारूरकरांच्या निवासस्थानी धडकला आणि आम्ही दिलेले पैसे परत द्या, अशी मागणी त्यांनी केली. या परिस्थितीला डॉ. धारूरकरांनी कसे तोंड दिले, हे कळू शकले नाही. मात्र त्यानंतर लगेच खासगी वाहन भाड्याने घेऊन ते कोलकाता विमानतळाच्या दिशेने रवाना झाले.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा