ग्रामीण महाराष्ट्राचा कौल कुणाला? मतमोजणी सुरू, दुपारपर्यंत स्पष्ट होणार चित्र

0
242
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी साडेसात वाजेपासून सुरू झाली आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतीतील २ लाख १४ हजार ८८० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे, या निकालाची उत्सूकता शिगेला पोहोचली असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी सुरू असून गावकारभाऱ्यांचे समर्थक या निकालाची उत्सुकतेने वाट पहात आहेत.

 राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत सरासरी ८० टक्के मतदान झाले होते. फक्त गडचिरोली जिल्ह्यातील मतमोजणी २२ जानेवारी रोजी होणार आहे. उर्वरित सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरू झाली आहे.

गावागावात रंगलेले निवडणुकीचे धुमशान आणि अनेक ठिकाणी झालेल्या चुरशीच्या लढतीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देणार, हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या ४६ हजार ९२१ प्रभागातील १ लाख २५ हजार ७०९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत २ लाख १४ हजार ८८० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. २६ हजार ७१८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

आदर्श गाव राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार या ग्रामपंचायती बिनविरोध निवडून येण्याची परंपरा मोडित काढून या वर्षी निवडणुकीला सामोरे जात आहेत. राळेगण हे समाजसेवक अण्णा हजारे यांचे तर हिवरे बाजार हे पोपटराव पवार यांचे गाव आहे. काही ग्रामपंचायती ५० ते ६० वर्षांपासून बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत. यावर्षीही त्या ग्रामपंचायतींनी ही परंपरा कायम ठेवली आहे. बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायतींची संख्या १ हजार ५२३ आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर होणारी ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका कोणत्याही राजकीय पक्षाच्या निवडूण चिन्हावर लढवल्या जात नसल्या तरी राजकीय पक्षांनी पुरस्कृत केलेले पॅनेल्स निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्र नेमका कोणाला कौल देणार, याची महाराष्ट्राला उत्सुकता आहे.

दृष्टिक्षेपात ग्रामपंचायत निवडणूकः

  • निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीः १४,२३४
  • बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायतीः १,५२३
  • प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीः १२,७११
  • एकूण प्रभागः ४६,९२१
  • एकूण जागाः १,२५,७०९
  • एकूण उमेदवारः ३,५६,२२१
  • बिनविरोध निवडून आलेले उमेदवारः २६,७१८
  • निवडणूक रिंगणातील उमेदवारः२,१४,८८०

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा