कोरोना पॉझिटिव्ह अधिपरिचारिकेला जिल्हा शल्य चिकित्सकांनी धमकावले, औरंगाबादेतील प्रकार

0
993
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर औरंगाबादच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती झालेल्या अधिपरिचारिकेला अर्ध्या रात्री आताच रूग्णालयातून बाहेर निघा, असे सांगत अरेरावी आणि अश्‍लील भाषेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी धमकावल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेच्या पतीने डॉ. कुलकर्णी यांच्याविरोधात थेट आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करत डॉ. कुलकर्णी यांची खातेनिहाय चौकशी करून निलंबित करावे आणि त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

अधिपरिचारिका जनाबाई शिवाजीराव मुंढे या जिल्हा सामान्य रूग्णालयात कोविड रूग्णांच्या सेवेत मागील वर्षभरापासून आपल्या कुटुंबापासून अलित्प राहुन सेवा देत आहेत. विशेष म्हणजे कोरोना काळात त्यांनी दिलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यांचा  कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरवही केला आहे. याच जनाबाईंना सर्दी आणि ताप आल्याचे जाणवल्याने त्यांनी १२ मार्च रोजी रात्रपाळीत कर्तव्यावर असताना संध्याकाळी अ‍ॅन्टिजेन टेस्ट करून घेतली. ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे लगेच तेथेच त्या उपचारासाठी भरती झाल्या. दुसर्‍या दिवशी जिल्हा सामान्य रूग्णालयाचे प्रमुख जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सुरक्षेच्या कारणास्तव येथील एसीएस मुदखेडकर यांना कॉल केला. त्याच दरम्यान त्यांनी मुदखेडकर यांच्या मोबाइलवरूनच जनाबाई यांना धमकावले. तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह नाही. कोणाच्या आदेशाने तुम्ही अ‍ॅन्टिजेन टेस्ट केली, ज्याने तुमची टेस्ट केली त्याला मी आताच निलंबित करतो. मला विचारल्याशिवाय या रूग्णालयात काहीही होत नाही. तू कशी काय अ‍ॅडमिट झाली. रिपोर्ट मला कसा दिसला नाही. आताच रूग्णालयामधून बाहेर निघा, अशा शब्दांत अरेरावी व पुढे अश्‍लील भाषा वापरत डॉ. कुलकर्णी यांनी जनाबाईंना धमकावले, असे जनाबाई यांचे पती सचिन सोनी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

अर्ध्या रात्री रूग्णालय सोडण्यास सांगितलेः डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी अर्ध्या रात्री जिल्हा सामान्य रूग्णालयातून बाहेर जाण्यास सांगितल्यानंतर जनाबाई यांनी सांगितले की, माझ्या घरात माझी वयोवृद्ध सासू व लहान मुले आहेत. मी पॉझिटिव्ह असताना एवढ्या रात्री घरी कशी जाऊ शकते. मात्र डॉ. कुलकर्णी ऐकण्यास तयार नसल्याने धूत हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट होते, असे जनाबाईंनी सांगितले. मात्र मुदखेडकर यांनी असे काहीही करू नका, तुम्ही येथेच उपचार घ्या. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे म्हणत जनाबाईंना धीर दिला. सध्या जनाबाई या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार घेत आहेत.

आरोग्य कर्मचार्‍यांच्या सुरक्षेवर प्रश्‍नचिन्हः शासकीय रूग्णालयातील प्रमुख अधिकार्‍यांनी इतर कर्मचार्‍यांचे प्रश्‍न सोडवणे ही त्यांची जबाबदारी नसून कर्तव्य आहे. मात्र डॉ. सुंदर कुलकर्णी यांच्याप्रमाणे शासकीय रुग्णालयातील प्रमुख जबाबदार अधिकारी आरोग्य कर्मचार्‍यांना अशी वागणूक देत असतील तर हा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी होणे गरजेचे आहे. चौकशी करून डॉ. कुलकर्णी यांना निलंबित करावे. तसेच महिला कर्मचारी शोषण कायद्यांतर्गत त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जनाबाई यांचे पती सचिन सोनी यांनी केली आहे.

माझा या प्रकरणाशी संबंध नाहीः मला या तक्रारीविषयी काहीच माहिती नाही. मूळात धमकावणे हे माझ्या रक्‍तातच नाही. असा प्रकार माझ्या काही कानावरही आलेला नाही. माझा या प्रकरणाशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही, असे जिल्हा शक्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी म्हटले आहे.जो कुल करतो तो कुलकर्णी, असा डॉयलॉगही कुलकर्णी मारला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा