महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध कायम राहणार, निर्बंधात कोणतीही सूट नाही!

0
219

मुंबईः देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र तिसऱ्या संभाव्य लाटेचा इशारा देण्यात आला आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्णवाढीचा दरही कमी आहे. असे असले तरी कोरोनाचा संभाव्य धोका पाहता राज्यात कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधात कोणताही सूट दिली जाणार नाही. सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

 राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राज्यातील निर्बंध शिथील करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्णवाढीचा दर कमी असला तरी पुढील संभाव्य धोका लक्षात घेता सावधपणे पुढे जावे लागणार आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता कोरोनाविषयक जे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत, त्यात कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही, असेही टोपे म्हणाले.

 राज्यात कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त लसी मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. राज्यातील लसीकरणाचा वेग चांगला असला तरी तो आणखी वाढवण्यावर आमचा भर आहे. ऑगस्ट महिन्यात राज्याला सव्वाचार कोटी लसीचे डोस मिळणे अपेक्षित आहे. राज्यात सध्या होणारा लसीचा पुरवठा कमी आहे, असेही टोपे म्हणाले.

एक हजार डॉक्टर्सची भरती करणारः राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी १ हजार डॉक्टर्सची भरती करण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात या नोकर भरतीची जाहिरात निघणार आहे. राज्यातील कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवानिवृतीचे वय ६२ वर्षे करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, असेही टोपे म्हणाले.

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना राज्यात प्रवेशः इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठीही राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या पुढे लसीचे दोन घेतलेल्या नागरिकांनाच राज्यात प्रवेश देण्यात येईल. यापूर्वी अन्य राज्यातील नागरिकांना महाराष्ट्रात प्रवेश देताना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पाहिला जात होता. आता लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र पाहूनच प्रवेश दिला जाणार आहे, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा