भारतात दररोज एका गावाच्या लोकसंख्येइतक्या कोरोना रुग्णांचा मृत्यू, ४ मेपासून १८ गावे जायबंदी!

0
216
प्रातिनिधिक छायाचित्र.

कौशल दीपांकर/मुंबईः देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढलेली मृतांची संख्या काही कमी होण्याचे नाव घेत नाही. देशात कोरोनाच्या संसर्गामुळे दररोज एका गावाच्या लोकसंख्येइतक्या लोकांचा मृत्यू होत आहे. देशातील बहुतांश मध्यम आकाराच्या गावांची लोकसंख्या ४ हजारांच्या आसपास आहे. त्यादृष्टीने पाहिले तर ४ मेपासून २१ मेपर्यंत झालेले मृत्यू पाहता कोरोनाने तब्बल १८ गावे जायबंदी करून टाकली आहेत.

 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकानंतर देशात दररोज चार लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. आता गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली असली तरी मृतांची संख्या मात्र देशाच्या उरात धडकी भरावी अशी स्थिती आहे. देशात कोरोनामुळे दररोज होणाऱ्या मृत्यूची सरासरी कायम आहे. आतापर्यंत देशात कोरोनाने तीन लाखांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज सकाळी संपलेल्या २४ तासांत देशात दोन लाख ५७ हजार २९९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख ५७ हजार ६३० रुग्ण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत.  देशात आतापर्यंत २ कोटी ३० लाख ७० हजार ३६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील एकूण २ कोटी ६२ लाख ८९ हजार २९० लोकांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या देशात २९ लाख २३ हजार ४०० सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नवीन कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू घटू लागली असली तरी मृतांच्या दैनंदिन संख्येत मात्र कोणतीही घट होताना दिसत नाही. मृतांची ही आकडेवारी केंद्र आणि राज्य सरकारांच्या चिंतेत भर घालणारी आहे. गेल्या २४ तासांत देशात ४ हजार १९४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण मृतांची संख्या २ लाख ९५ हजार ५२५ वर पोहोचली आहे.

२०१९ च्या आकडेवारीनुसार देशात ६ लाख ६४ हजार ३६९ गावे आहेत. त्यापैकी ३,९७६ गावांची लोकसंख्या १० हजारांहून अधिक आहे. तर २००० ते ४९९९ लोकसंख्या असलेली ९६ हजार ४२८ गावे आहेत. यापैकी ५५ टक्क्यांहून अधिक गावे ही ४ हजार किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्येची आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकानंतर देशात दररोज सरासरी ४ हजार किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. म्हणजेच दररोज एका गावाच्या लोकसंख्येइतक्या लोकांचा मृत्यू होत असून त्यादृष्टीने कोरोनाची दुसरी लाट दररोज देशातील एक मध्यम आकाराचे गावच गिळंकृत करत चालला आहे. यावरून या संकटाची भीषणता लक्षात येते. ४ मेपासून २१ मेपर्यंत कोरोनाने दररोज ४ हजारांहून अधिक लोकांचे बळी घेतले आहेत. म्हणजेच या १८ दिवसांत कोरोनाने मध्यम आकाराची तब्बल १८ गावेच जायबंदी करून टाकली आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे सर्वाधिक नवीन कोरोना रुग्ण आढळण्याच्या बाबतीत गेल्या काही दिवसांत पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तामिळनाडूत सर्वाधिक ३६ हजार १८४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल कर्नाटकमध्ये ३२ हजार २१८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. तर केरळमध्ये २९ हजार ६७३ रुग्णांची भर पडली आहे. चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र असून राज्यात २९ हजार ६४४ रुग्ण आढळले तर पाचव्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आहे. तेथे २० हजार ९३७ रुग्ण आढळून आले आहेत.

४ मेपासूनचे दररोजचे मृत्यू असेः

 • ४ मे: ३,४४९
 • ५ मे: ३,७८०
 • ६ मे: ३,९८०
 • ७ मे: ३,९१५
 • ८ मे: ४,१८७
 • ९ मे: ४,०९२
 • १० मे: ३,७५४
 • ११ मे: ४,२०५
 • १२ मे: ४,१२०
 • १३ मे: ४,०००
 • १४ मे: ३,८९०
 • १५ मे: ४,०७७
 • १६ मे: ४,१०९
 • १७ मे: ४,३१९
 • १८ मे: ४,५२९
 • १९ मे: ३,८७४
 • २० मे: ४,२०९
 • २१ मे : ४,१९४

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा