औरंगाबादेतील खासगी रूग्णालयांकडून अन्य आजारांवरील उपचारासाठी कोरोना चाचणीची सक्ती

0
146
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबादः इतर आजारांवर नागरिकांना उपचार मिळावेत म्हणून औरंगाबादेत महानगरपालिकेच्या आदेशानुसार खासगी रूग्णालये सुरू झाली असली तरी काही खासगी रूग्णालयांनी उपचाराआधीच कोरोना चाचणी करून घेण्याची सक्ती केल्यामुळे अन्य आजारांच्या रूग्णांना हकनाक कोरोना चाचणीसाठी साडेचार ते पाच हजार रुपयांचा भुर्दंड पडत आहे. खासगी लॅबमध्ये स्वॅब देऊन ही चाचणी करून घेतल्यानंतर उपचार सुरू केले जातील, असा दंडकच औरंगाबादेतील काही खासगी रूग्णालयांनी घातला आहे.

औरंगाबादेत कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीला अनेक रुग्णांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते. नंतर हे रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याचे समोर येताच अनेक खासगी रुग्णालये, दवाखान्यांनी आपली ओपीडी बंद केली. त्यामुळे इतर लहान मोठ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहेत. दुसरीकडे महापालिकेच्या आरोग्य केंद्रावरही रुग्णांची गर्दी वाढली आहे. एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे अन्य आजारांवर उपचार मिळणे बंद झाल्याचे पाहून महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी खाजगी रुग्णालयांनी त्यांची ओपीडी सुरु करावी, असे आदेश काढले आहेत. कोरोना आजार टाळण्यासाठी आवश्यक सर्व निर्देश पाळून इतर आजारी रुग्णांना उपचार देण्याचे या आदेशात नमूद केले आहे. तसेच धर्मादायकडे नोंदणी असलेल्या पंधरा रुग्णालयांनी कोरोना व्यतिरिक्त इतर आजारी रुग्णावर उपचार सुरु करण्याची सूचना केली आहे. जी रुग्णालये आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला होता. या आदेशानुसार बंद असलेली खासगी रूग्णालये सोमवारपासून सुरू झाली आहेत. मात्र आता यात काही खासगी रूग्णालयांनी उपचाराआधीच रूग्णांना कोरोना चाचणी करून घेण्याची सक्ती केली आहे. रूग्णावर शस्त्रक्रिया करायची असेल किंवा एखाद्या महिलेची प्रसुती करायची असेल, अशा रूग्णांसाठी तर विशेष करून आधी कोरोना चाचणी करून घेण्याची सक्ती केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोरोनाग्रस्त भागांतील रूग्णांची महापालिकेकडूनच तपासणी केली जात आहे. अशा भागातील रूग्णांची वेगळी चाचणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र ज्या भागात अद्याप कोरोनाचा एकही रूग्ण नाही, अशा भागांतील रूग्णांनाही कोरोना चाचणीची सक्ती केली जात असल्याचे समोर आले आहे.

  उपचार बाजूलाच, चाचणीसाठीच पिळवणूकः खासगी रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या रूग्णांचे स्वॅब खासगी लॅबचालकांकरवी घेऊन कोरोना तपासणीसाठी घाटीतील प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणाच उभी करण्यात आली आहे. बदल्यात रूग्णांकडून साडेचार ते पाच हजार रूपयांचा खर्च वसूल केला जात आहे. महापालिका प्रशासनाकडून प्राप्त आकडेवारीनुसार शहरातील खासगी लॅबमधून आतापर्यंत अशा प्रकारचे २५६ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घाटीतील प्रयोगशाळेला प्राप्त झाले आहे. कोरोना वगळता इतर उपचारांसाठी, विविध प्रकारच्या शस्रक्रिया वा महिलांच्या प्रसुतीपूर्वी आधी घाटी किंवा जिल्हा सामान्य रूग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करून घेण्यास वेळ लागत असल्यामुळे रुग्णांनी नाईलाजास्तव खासगी लॅबचा मार्ग निवडावा लागत असल्याचे निदर्शनास येत आहे.

आकाशवाणी परिसरातील एका रूग्णालयातील प्रकारः आकाशवाणी चौक परिसरातील एक खासगी रूग्णालय गरोदर महिला व बालकांवरील उपचारासाठी प्रसिद्ध आहे. या रूग्णालयात औरंगाबाद तालुक्यातील एक गर्भवती महिला प्रसुतीसाठी आली होती. तेव्हा येथील रूग्णालय प्रशासनाने संबंधित महिलेच्या कुटुंबीयांना आधी रूग्णाची कोरोना चाचणी घ्या, त्यानंतरच महिलेची प्रसुती व सिझेरियन केले जाईल, असे सांगितले. विशेष म्हणजे हे कुटूंब गरिब होते. घाटी व जिल्हा सामान्य रूग्णालयात आधीच कोरोना रूगणांची संख्या अधिक आहे. येथे चाचणीसाठी जातानाच कुणाशी संपर्क येऊन कोरोनाची बाधा होण्याच्या धास्तीने या कुटुंबीयाने खासगी लॅबमधूनच कोरोना चाचणी करून घेण्याची तयारी त्या रूग्णालयाकडे दर्शवली. ही घटना घडताना तेथे असलेल्या एका सुजाण नागरिकाने ही माहिती माध्यमांना दिली.

काय कारवाई करता येईल ते बघतोः
“खासगी रूग्णालयांकडून मूळ आजारावरील उपचाराआधीच कोरोना चाचणीसाठी सक्ती होत असेल तर यावर नेमकी काय कारवाई करायला हवी, याबाबत मी आत्ताच सांगू शकत नाही. मात्र हे प्रकार रोखण्यासाठी नेमके काय करता येईल, याविषयी कोणती कार्यवाही करता येईल, ते बघतो.”

अस्तिककुमार पांडेय, महापालिकेचे प्रशासक.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा