अफवांना बळी पडू नकाः मासिक पाळीतही कोरोना प्रतिबंधक लस घेणे सुरक्षित!

0
148
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः राज्यात एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने फैलावत असताना दुसरीकडे अफवांचे पिकही तेवढ्याच झपाट्याने पसरत चालले आहे.  अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलांनी मासिक पाळीच्या पाच दिवस आधी आणि पाच दिवस नंतर कोरोनाची लस घेऊ नये, असे अपप्रचार या पोस्टमध्ये केला आहे. त्यामुळे महिलांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून या पोस्टमधील दावा अशास्त्रीय आहे. महिलांनी मासिक पाळीच्या काळातही लस घेणे पूर्णतः सुरक्षित आहे, असे स्पष्टीकरण डॉक्टरांनी दिले आहे.

मासिक पाळीच्या काळात महिलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने या काळात लस घेऊ नये, असे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये सांगितले गेले आहे. त्यामुळे मासिक पाळी आणि लस घेण्याचा काही संबंध आहे का?  असे प्रश्न तरूणी आणि महिलांच्या मनात निर्माण होत आहेत. या पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा खोटा आणि अशास्त्रीय असल्याचे स्पष्टीकरण डॉक्टरांनी दिले आहे.

 मासिक पाळीच्या काळात शरीरात अनेक बदल होतात, हे खरे असले तरी या काळात रोगप्रतिकारकशक्ती कमी होते, यात कोणतेही तथ्य नाही, लसीमुळे कोरनापासून संरक्षण मिळण्यात मदतच होणार आहे, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. अशा मेसेजकडे दुर्लक्ष करून महिला आणि तरूणींनी लस घ्यावी, असे आवाहनही डॉक्टरांनी केले आहे.

आपल्याकडे मासिक पाळीच्याबाबत ज्या अंधश्रद्धा आहेत, त्यातूनच अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कोरोना प्रतिबंधक लस घेणे आणि मासिक पाळीच्या काळातील रोगप्रतिकारशक्ती याचा कुठलाही परस्पर शास्त्रीय संबंध नाही. अशा चुकीच्या आणि खोट्या प्रचाराला बळी पडू नये. महिला आणि तरूणींनी मासिक पाळीच्या काळातही लस घेण्यास काहीही हरकत नाही, असे स्त्रीरोग व प्रसुतीतज्ज्ञांचे मत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा